खडकपाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल
कल्याण : आधारवाडी कारागृहात ई-मुलाखतीच्या कारणावरून दोन न्यायाधीन बंदींनी कारागृह शिपायासोबत धक्काबुक्की आणि झटापट केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शिपाई राजू पोरे यांच्या खांद्याला दुखापत झाली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन्ही बंदींविरोधात बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, कारागृह शिपाई राजू पोरे हे सोमवारी बंदींच्या नातेवाईकांसोबत होणाऱ्या ई-मुलाखतीच्या कक्षात ड्युटीवर होते. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी विक्रम ऊर्फ विकी राजेंद्र कवठणकर आणि हितेश ऊर्फ मोगली कवठणकर हे दोघे आधारवाडी कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून आहेत.
दोन्ही बंदींच्या नातेवाईकांनी ई-मुलाखतीसाठी केलेल्या विनंतीला शिपाई पोरे यांनी मंजुरी दिली होती. मात्र, काही कारणामुळे ई-मुलाखत कनेक्ट होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही बंदींना मुलाखत कक्षाबाहेर उभे राहण्यास सांगण्यात आले. मात्र, दोन्ही बंदी पुन्हा ई-मुलाखत कक्षात आले आणि तेथील लॅपटॉप उचलला. शिपाई पोरे यांनी त्यांना लॅपटॉप घेण्यास मनाई केली. यावरून दोन्ही बंदींनी पोरे यांच्या वर्दीला हात घालत त्यांच्यासोबत धक्काबुक्की व झटापट केली. यावेळी बंदींनी पोरे यांना कमरेला पकडून उचलण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली.
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार शिपाई राजू पोरे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही न्यायाधीन बंदींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *