– विधेयक २०२३ मध्येच मंजूर –वर्षा गायकवाड
मुंबई : महिला आरक्षण विधेयकाला राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा विरोध आहे असा खोटा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. काँग्रेस पक्षानेच महिला आरक्षणचा निर्णय देशात सर्वात आधी घेऊन तो लागूही केला पण भाजपाची महिला विरोधी मानसिता असल्यानेच २०२३ मध्ये संसदेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊनही भाजपाचे काही बोलघेवडे नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत, असे प्रत्युत्तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३% आरक्षण देणारे ‘संविधान (१०६ वी घटनादुरुस्ती) विधेयक’ २०२३ मध्ये संसदेत मंजूर झाले आहे, या विधेयकाला काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांनीही एकमुखाने पाठिंबा दिलेला आहे पण त्याची अंमलबजावणी मात्र भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने अद्याप केलेली नाही. महिलांना आरक्षण देण्याची मानसिकता भाजपाची नाही. त्यांच्या मुळ विचारसरणीत आरक्षणाला विरोध आहे आणि महिलांबद्दलचा भाजपाचा दृष्टीकोन सर्वांना माहित आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेले आहे पण आता भाजपा सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन विधेयक मांडण्याचा प्रयत्न करत आहे. डिलिमिटेशन विधेयक हे देशाचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकड्यात विभाजन करणारे विधेयक आहे म्हणून त्याला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धीभेद करू नये असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमात महिलांची सुरक्षा, अधिकार व त्यांच्या समस्यांवर चर्चा केली. ही चर्चा सर्व जाती धर्माच्या मुली व महिलांसाठी होती पण प्रत्येक गोष्टीकडे जात व धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची विकृत मानसिकता भाजपाची असल्याने ते या मुद्द्यालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. छात्रों की गुंज कार्यक्रमात मुलींनी भाजपाला योग्य तो संदेश दिल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून बिथरलेला भाजपा राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करत आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *