डॉ. रविंद्र शेळके यांचे धान उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन
अशोक गायकवाड
अलिबाग: धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने धान विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नोंदणी करता येणार असून, शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांनी केले आहे. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या धानाला निर्धारित हमीभाव मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी धान विक्री पूर्वी संबंधित खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे धान उत्पादकांनी नोंदणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. नोंदणीसाठी आधारकार्डशी संलग्न बँक खात्याचा क्रमांक देणे आवश्यक आहे. तसेच अॅग्रीस्टॅकवरील फार्मर आयडी (शेतकरी क्रमांक) असणे बंधनकारक आहे. आवश्यक बाबींची पूर्तता नसल्यास ऑनलाइन नोंदणी करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. केंद्र शासनाची ही योजना शेतकऱ्यांना बाजारातील कमी दरापासून संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येते. राज्यात विकेंद्रीकृत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. हमीभावाचा लाभ गमावू नये, यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबरपूर्वी जवळच्या धान खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, असे डॉ. रविंद्र शेळके यांनी आवाहन केले आहे.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *