कल्याणमध्ये निदर्शने करत व्यक्त केला निषेध
कल्याण : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरणाच्या संतापजनक प्रकाराविरोधात कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने आज जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांच्या नेत्तृत्वाखाली कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शेन करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निदर्शेने केल्यानंतर भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी कूच केली, मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
खर्गे यांचा अपमान हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नाही, तर सामाजिक समानता आणि संविधानिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मानसिकते विरोधातील लढा आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांना जे हक्क मिळाले आहेत ते संविधानामुळे मिळाले असून हे सरकार दलित विरोधी असल्याचा आरोप जपजीत सिंग यांनी केला. त्यांनी हि दलित विरोधी विचारधारा न सोडल्यास त्यांचे शुद्धीकरण युवक कॉंग्रेस करणार असल्याचा इशारा देखील यावेळी सिंग यांनी दिला. यावेळी कॉंग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
०००००
