खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

सुनिल इंगळे

उल्हासनगर :  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि डीपीडीसीच्या मंजुरीने मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर येथे १३ बेडेड डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले असून, आज या सेंटरचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. मध्यवर्ती रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर डायलिसिस सेंटर सुरू असल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना जिने चढणे-उतरणे तसेच लिफ्ट बंद असताना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यातच काही डायलिसिस मशीन बंद पडल्यामुळे रुग्णांची अडचण अधिक वाढली होती.

ही बाब लक्षात घेऊन मुख्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बन्सोडे यांनी सदर प्रश्नाबाबत डीपीडीसीकडे पत्रव्यवहार करून नवीन डायलिसिस युनिटसाठी पाठपुरावा केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून डीपीडीसीकडून १३ बेडेड डायलिसिस युनिटला मंजुरी मिळाली. महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी हे डायलिसिस सेंटर लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी मध्यवर्ती रुग्णालयाला वारंवार भेटी देऊन संबंधित अधिकारी व प्रशासनाशी चर्चा करून रुग्णांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचा आग्रह धरला.

सोमवारी आमदार कुमार अयलानी, माजी आमदार पप्पू कलानी, महापौर अश्विनी कमलेश निकम, आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे, मुख्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बन्सोडे आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत १३ बेडेड डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या डायलिसिस सेंटरमुळे उल्हासनगर व परिसरातील गरजू रुग्णांना मध्यवर्ती रुग्णालयात मोफत डायलिसिस उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. नागरिकांना सुलभ, दर्जेदार आणि मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे डायलिसिस सेंटर उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *