ठाणे – अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा नागरिकांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला आहे. तर आम्हाला विश्वासात घ्या, अंतर्गत रिंग मेट्रोचा पूर्वीचा मूळ मार्ग कायम ठेवा. ठाणे महानगरपालिका, शासन, प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करा, या मागणीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील नागरिकांनी प्रथम सभा घेऊन सह्या मोहीम घेऊन व्यापक जनजागृती केली. तर याच मागणीसाठी गुरुवारी सायंकाळी आई माताजी चौक ते लोकमान्यनगर टीएमटी डेपो पर्यंत जागोजागी नागरिकांनी मानवी साखळी करत निदर्शने केली.
लोकमान्य टीएमटी डेपो, आई माता मंदिर, कोरस रोड, वर्तकनगर नाका आणि शास्त्रीनगर मार्गे नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे हे दर्शविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.  रिंग मेट्रोचा मार्ग बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, हजारो नागरिकांचे विस्थापन तसेच वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाची वस्तुस्थिती मांडण्यात आली असून, त्यांनी देखील या विषयाची गांभीर्याने नोंद घेतली आहे.
अंतर्गत रिंग मेट्रोचा पूर्वीचा मूळ मार्ग कायम ठेवा या मागणीबाबत सर्व पक्षाचे राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होते. आम्ही रहिवाशांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.  आंदोलनात नगरसेवक दिलीप बारटक्के  नगरसेविका,कांचन चिंदरकर, माजी  नगरसेवक दशरथ पालांडे आदी उपस्थित होते. आंदोलनात म्हाडा वसाहत, दोस्ती, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस टॉवर, रुणवाल प्लाझा, अनिझरा, तमन्ना, अमित, भैरी भवानी, तसेच डवले नगर परिसरातील विविध सोसायटी व गृहसंकुलातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *