पश्चिम विभागीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर प्रोन प्रकारात दमदार कामगिरी
गोवा : गोव्यात झालेल्या तेराव्या पश्चिम विभागीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राची १५ वर्षीय नेमबाज स्वामीज्ञा विलास शेडगे हिने उल्लेखनीय कामगिरी करत तिहेरी सुवर्णपदक पटकावले. स्मॉल बोअर स्पोर्ट रायफल ५० मीटर प्रोन या प्रकारात वरिष्ठ, युवा आणि कनिष्ठ अशा तिन्ही गटांत स्वामीज्ञाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
स्वामीज्ञाच्या या यशात तिचे प्रशिक्षक निलेश अभंग यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. सातत्यपूर्ण सराव, अचूक नेमबाजी आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर तिने पश्चिम विभागीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध केले. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावरील पात्रता आणि सहभागासाठी या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. पश्चिम विभागांतर्गत झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि मध्य प्रदेशातील नेमबाजांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या स्पर्धेचे आयोजन गोव्यात करण्यात आले. स्वामीज्ञाच्या तिहेरी सुवर्णकामगिरीमुळे तिच्या पुढील राष्ट्रीय स्तरावरील वाटचालीला मोठे बळ मिळाले असून, तिच्या या यशाचे नेमबाजी क्षेत्रातून कौतुक होत आहे.
