मुंबई  : विधिमंडळाच्या इतिहासात आज अभुतपुर्व प्रसंग घडला. विधान परिषदेच्या इतिहासात शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रथमच विरोधी पक्ष नेत्यांला निलंबित करण्याचा प्रसंग आज विधान परिषदेच्या सभागृहात झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात भाजपाच्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. याची गंभीर दखल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली आणि आज अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले.      कॉग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कथित हिंदूविरोधी वक्तव्यावरून विधानपरिषदेत गोंधळ झाला. अंबादास दानवे यांनी भाजपचे विधान परिषद सदस्य  प्रसाद लाड यांच्याकडे हातवारे करीत शिवीगाळ केली. त्यालाही तसेच उत्तर देत  प्रसाद लाड यांनी शिवीगाळ केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत दानवेंनी माफी मागून विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तर चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली होती.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप सदस्यांनी अंबादास दानवे यांच्यावर कारवाईची मागणी गदारोळात केली. त्यामुळे एका तासा करीता कामकाज तहकुब करण्यात आले. पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू होताच उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, गटनेत्यांच्या बैठकीला आंबादास दानवे उपस्थित नव्हते. कालच्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली नाही. आमच्या समोर हा प्रकार घडला. त्यांच्या पक्षाच्या नेते मंडळींनी विचार करायला हवा की, संबंधित व्यक्ती महिलांसमोर अशी भाषा वापरत आहे, हे गंभीर आहे म्हणून ही न्याय आणि उचित कारवाई केली आहे. संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला तो बहुमताने संमत करण्यात आला.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निर्णयावर चर्चा करणाऱ्या विरोधकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, सभागृहात अशी घटना कधीही घटना घडली नाही त्यामुळे अशा ठरवावर काधीही चर्चा होतं नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आवाजी मतदानाने अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निलंबनाच्या कारवाई विरोधात जोरदार निषेधार्थ घोषणाबाजी केली आणि कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *