ठाणे : जिल्ह्यात रासायनिक खत पुरवठा संबधातील नियोजन सुरळीत सुरू आहे. रासायनिक खतांच्या बाबतीत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाखाली सर्व साधारण क्षेत्र ६०,००० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी भात पिकाखालील क्षेत्र ५३, ९२३ एवढे आहे. त्याच प्रमाणे नाचणी पिकाखाली २४०६ हेक्टर, वरी पिकाखाली १००५ हेक्टर, कडधान्य पिकाखालील ९५५ हेक्टर, गळीत धान्य ४७२ हेक्टर आणि भाजीपाला पिकाखालील ७१५ हेक्टर आहे. जिल्ह्यासाठी ११,११० मे. टन रासायनिक खतांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. शासनाकडून १०,००० मे.टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीस १४५० मे.टन रासायनिक खतांचा साठा कृषि सेवा केंद्रांकडे उपलब्ध होता. अखेर जिल्ह्यात ६४२८.२२ मे.टन रासायनिक खतांचा पुरवठा झालेला आहे. त्यापैकी युरीया- ५८९३.२२, DAP – ५३, पोटॅश खते २४ मे. टन, सुफर फॉस्फेट १८ मे.टन व संयुक्त व मिश्र खते ४४० मे. टन असा पुरवठा आहे. ठाणे जिल्ह्यात खतांची कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. रासायनिक खतांची विक्री पॉस मशिनद्वारे करण्यात येत असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच खतांची विक्री करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हंगामात खतांची टंचाई जाणवू नये यासाठी ९१० मे.टन युरीया व २० मे.टन DAP खतांचा संरक्षित साठा (Buffer Stock) करण्यात आला आहे. आतापर्यंत ५,५७३ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाच्या रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत अशी माहिती कृषि विभगाकडून देण्यात आली आहे.
