महिलांच्या बँक खात्यात एकत्र जमा होणार दोन हफ्ते
स्वाती घोसाळकर
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्याआधी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी 1500 रुपये देण्यात असल्याची घोषणा करण्यात आली होती. येत्या 17 तारखेला महिलांना दोन महिन्यांचे हप्ते दिले जाणार आहेत. रक्षाबंधनाची भेट म्हणून दोन हप्ते एकदम दिले जाणार आहेत. मात्र, या योजनेचे पैसे कालपासूनच देण्यास सुरुवात केली आहे. काही महिलांच्या खात्यात हे पैसे जमाही झाले आहेत. पण मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावरून चर्चाही सुरू झाली आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. मात्र, मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे का दिले जात आहेत, याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. ‘सध्या चेकींग सुरू आहे. त्यामुळे मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले आहेत. 17 तारखेला पैसे ट्रान्स्फर करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत. उद्या 17 तारखेला तांत्रिक अडचणीमुळे खात्यात पैसे गेले नाही तर तुम्हीच बोंब माराल. त्यामुळे आम्ही आजच हे पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. ही ट्रायल रन सुरू असल्याने मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत,’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पहिली लाभार्थी महिला ही मुंबईची महिला ठरली आहे. पण महत्वाचं म्हणजे ही महिला आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून आहे. वरळी मतदारसंघावर महायुतीचं प्रचंड लक्ष आहे. या विधनासभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुतीने चांगलीच फिल्डिंग लावली आहे. त्यातच आता लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वरळीत दिला गेल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे.
सावत्र भावांपासून सावधान !
‘आम्ही म्हणत होतो पैसे खात्यात येणार. त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सावत्र भावांपासून सावध राहा. त्यांना ही योजना बंद करायची आहे. त्यासाठी ते कोर्टात गेले होते. कोर्टाने त्यांना फटकारलं. त्यांचा अर्ज फेटाळून लावला. आमचं सरकार देणारं आहे. आम्ही जे बोलतो तेच करतो. आम्ही पैसे परत घेणारे नाही’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
