झोप ही माणसाच्याच नव्हे तर प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत महत्वाची गोष्ट असते. कारण एक दिवस जरी झोप व्यवस्थित झाली नाही तर दुसऱ्या दिवशी त्याचे कोणते परिणाम होतात हे आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवले आहे. त्यातच आजकाल मोबाईल आणि त्यावरील विविध आकर्षणे यामुळे प्रत्येकालाच एका प्रकारची सुस्ती आल्यासारखी वाटणे साहजिकच आहे असे तज्ञांचे मत आहे.
यातच एक आव्हानात्मक असा प्रयोग केला गेला. ‘झोपे-विना किती काल?’ असे हे आव्हान होते आणि यात कुणीही प्रौढ व्यक्ती भाग घेऊ शकत होती. यातच १९ वर्षे वयाच्या यू-ट्यूब चॅनेल असलेल्या एका तरुणाने यात भाग घ्यायचे ठरवले. त्याचे ‘विना-झोप आव्हान ‘लाइव्ह’ दाखवले जात होते. सातत्याने झोपेविना राहण्याचा जागतिक विक्रम करण्याचे त्याच्या मनात होते परंतु २५० तास झाल्यानंतर मात्र प्रेक्षकांनी त्याच्या प्रकृतीविषयी काळजी दाखवायला सुरुवात केली आणि अखेर २६४ तास २४ मिनिटानंतर या तरुणाने लोकाग्रहास्तव आपले आव्हान संपवले.
मात्र त्याला याचा फटका देखील बसला कारण त्याचे चॅनेल बंद केले गेले. त्याचे म्हणणे असे होते की त्याने जागतिक विक्रम पार केला आहे परंतु या अगोदर प्रस्थापित झालेला गिनेस जागतिक विक्रम मात्र तो पार करु शकला नव्हता. या क्षेत्रातील अखेरचा गिनेस जागतिक विक्रम १९८६ सालचा आणि ४५३ तासांचा म्हणजेच जवळजवळ १९ दिवस विना-झोप राहण्याचा होता. विना-झोपेच्या सुरक्षितता कारणांसाठी गिनेस जागतिक विक्रम संस्थेने १९९७ साली या विक्रमाचे नोंद घेणेच बंद केले आणि हा एक अतिशय योग्य निर्णय होता.
झोपेविना बराच काळ राहणे ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोक्याची बाब आहे हे तर मान्य असायलाच हवे त्याशिवाय प्रौढ माणसाला रोज रात्री आणि नियमितपणे किमान सात तासांची झोप आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने हे ध्येय असायला हवे. दीर्घकाळ अशी झोप मिळत नसेल तर त्यामधून नैराश्य, मधुमेह, लट्ठपणा, हृदय रोग आणि वाढलेला रक्तदाब हे विकार होऊ शकतात.
दिवसभराच्या कामानंतर आपल्या दिनाचार्येचा एक महत्वाचा भाग म्हाणून झोपेकडे पाहिले पाहिजे. याचे सरळ आणि स्पष्ट कारण असे असते की शरीर संस्थेला अंतर्गत डागडुजी आणि पूर्ववत होण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याची हीच वेळ असते. सर्वसाधारणपणे झोपेच्या सुरुवातीच्या तीन स्थिती मानल्या जातात.
या स्थितीमध्ये आराम आणि अन्न-पचन यासाठी काम करणाऱ्या परा-सहानुभूती मज्जा-संस्थेकडे नियंत्रण असते. यावेळी आपला हृदयाची गती आणि रक्तदाब हे दोन्हीही कमी करण्याचे काम केले जाते. झोपेच्या अखेरच्या स्थितीला जलद नेत्र हालचाल अथवा
रॅपिड आय मूव्हमेंट असे म्हणतात. यावेळी हृदयाचे स्पंदन वाढते आणि डोळे हलतात. या स्थितीत काही आकलन विषयक तसेच नवे काहे शिकणे आणि स्मरणशक्ती यावर काम केले जाते. झोपण्यापूर्वी मद्यप्राशन कॅफिनयुक्त पदार्थ यांचे सेवन केले तर झोप विचलित होऊ शकते. झोप न येणे ही गोष्ट कधी काळी अथवा जुनाट म्हणजे दीर्घकाळापासून असू शकते.
२४ तास झोपेविना गेले तर काम करण्याची उर्जा कमी होते. डोळे लाल होणे, चिडचिड वाढणे आणि मनात काहीतरी अंधुक झाले आहे असे वाटणे या गोष्टी दिसू शकतात. झोपेविना काढलेला दुसरा दिवस अधिक तीव्र परिणाम घेऊन येतो. झोपेची गरज वाढते आणि मग अनिच्छेने ३० सेकंदांची सूक्ष्म-झोप या नावाने ओळखली जाणारी डुलकी घेतली जाते. कामाच्या ठिकाणी ही धोकादायक ठरू शकते. सलग तिसऱ्या दिवशीही झोप मिळालीच नाही तर सूक्ष्म-झोपेचे प्रमाण अधिक वाढते आणि नवी लक्षणे दिसू लागतात. काहीतरी आहार करावा अशी इच्छा होत असते. या नंतरच्या म्हणजे चार दिवसानंतरच्या काळात अधिकच सांभाळून राहण्याची गरज असते.
तेव्हा शक्यतो विना-झोप न राहता झोपेचे चांगले नियोजन करा आणि निरोगी राहणे हे चांगले…
प्रसन्न फीचर्स
