स्थानिकांची मागणी

माथेरान : वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे नेहमीच गाड्यांना पार्किंग करण्यासाठी जागा अपुऱ्या प्रमाणात होत असल्याने दस्तुरी नाक्यावर वनखात्याच्या जागेत सर्वत्र जंगलांनी व्यापलेल्या या ठिकाणी जवळपास एकहजार गाड्यांची सोय होणेकामी येथील बोरीचे मैदानात स्पायरल पार्किंग विथ फॅब्रिकेशन वर्क्सच्या साहाय्याने व्यवस्था केल्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय उपलब्ध नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

माथेरान रेल्वेच्या अवघ्या दोन फेऱ्यामुळे होणाऱ्या प्रवासाला त्रागुन सर्वच पर्यटक नाईलाजाने स्वतःच्या मोटार गाड्या अथवा खाजगी वाहनांच्या साहाय्याने माथेरान गाठण्यासाठी धावपळ करीत असतात. परंतु वाहनतळ असलेल्या तसेच माथेरानकरांच्या व्यावसायिक दृष्टीने माथेरानचा उंबरठा समजल्या जाणाऱ्या दस्तुरी या ठिकाणी आल्यावर सुट्टयांच्या हंगामात इथल्या अपुऱ्या जागेमुळे बाहेर पडताना पर्यटकांची त्रेधातिरपीट उडते. अनेकदा घोडेवाले, हमाल, रूम एजंट यांच्या गर्हाड्यातुन निसटने म्हणजे त्यांना एकप्रकारे अग्निदिव्य पार करून बाहेर यावे लागत असते.

माथेरान गावाची शीव असलेल्या चांगभले या मंदिरापासून थेट वनखात्याच्या पार्किंग पर्यंत गाड्यांची पार्किंग होत असते. परिणामी नवख्या पर्यटकांना चांगभले मंदिरापासून दस्तुरी नाक्यापर्यंत यायला खूपच त्रासदायक ठरत असते. कारण दोन्ही बाजूला खाजगी वाहने पार्क केलेली असतात. तर वनखात्याच्या जागेत शिरकाव करताना वेळप्रसंगी वनखात्याच्या अपुऱ्या जागेमुळे सुद्धा आपली वाहने कुठे पार्क करावीत हा यक्षप्रश्न त्यांना नेहमीच सतावत असतो.नुकताच दिवाळीच्या सुट्टयांच्या हंगामात पार्किंगच्या जागे अभावी माथेरान न पाहता माघारी जावे लागत असल्याने याचा परिणाम पर्यटनावर प्रामुख्याने होताना दिसून येत होता. चार वर्षांपूर्वी एमएमआरडीए च्या माध्यमातून याच पार्किंग साठी जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता त्याचा विनियोग चुकीच्या पद्धतीने केल्यामुळेच अशी अवस्था निर्माण झाली आहे. याच पैशांत सुसज्ज स्पायरल पार्किंग झाली असती परंतु तत्कालीन लोकप्रतिनिधीनी भविष्याचा विचार न केल्यामुळे आज पार्किंगची दयनीय अवस्था आहे.

सध्या जरी दस्तुरी येथील अपुऱ्या पार्किंगच्या गैरसोयीमुळे जुंमापट्टी येथे गाड्यांना आश्रय दिला गेला. तरी आगामी काळात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात याच भागातील बोरीचे मैदान येथे नाविन्यपूर्ण अशी जवळपास १००० गाड्यांची जादा पार्किंगची सोय होणेकामी स्पायरल पार्किंग सोबतच फॅब्रिकेशन वर्क्स अशाप्रकारे पार्किंगची अद्ययावत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सातत्याने पर्यटन हंगामात होणारी वाहतूक समस्या यामुळे अनेक पर्यटकांना आपली वाहने घेऊन माथेरानला येता येत नाही. ती अर्ध्या घाटात किंवा जुमापट्टी येथे उभी करून पुढील वेळखाऊ प्रवास करावा लागतो .या करिता वनविभागाने आपल्या अखत्यारीत असणाऱ्या माउंटबेरी येथे रस्ता करून पार्किंगची व्यवस्था केल्यास फार मोठ्या प्रमाणात समस्या मार्गी लागेल.

शिवाजी शिंदे–माजी विरोधी पक्षनेते  माथेरान

माथेरानला पर्यटन हंगामात 1000 गाड्या पार्क होतील अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने MP93 हा प्लॉट  नगरपरिषदेकडे वर्ग करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याजागी तीन मजली स्पायरल पार्किंगची व्यवस्था करता येईल, सद्यस्थितीत येणाऱ्या सर्व गाड्यांची पार्किग वनविभागाच्या जागेवर केवळ जागेचे भाडे घेऊनन केली जाते. अनेकवेळा झाडाखाली गाडी पार्क करावी लागते.काहीवेळा पावसाळ्यात मुसळधार पावसात गाड्यांवर वृक्ष उन्मळून पडून सदर गाड्यांचे अतोनात नुकसान होते. याची संपूर्ण जबाबदारी त्या पर्यटकालाच घ्यावी लागते. त्यामुळे माथेरान च्या उत्तम पर्यटनासाठी अद्ययावत पार्किंगची नितांत आवश्यकता आहे.

योगेश जाधव -अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *