सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी समोर
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकीत एनडीएची महाराष्ट्रासह राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये पिछेहाट होणार असल्याची धक्कादायक आकडेवारी सर्व्हेतून समोर आलीय. लोकसभा निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या १९ एप्रिल रोजी आहे.
लोकपोल सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला २६ ते २८, काँग्रेसला २ ते ४ आणि भाजपला ११ ते १३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या २०१९ च्या निवडणूकीत भाजपाने १८ जागा जिंकल्या होत्या.
राजस्थानमधील लोकपोल सर्वेक्षणात एनडीए आघाडीला १७ ते १९ जागा आणि इंडिया आघाडीला ६ ते ८ जागा मिळतील, असा अंदाज आहे. २०१९ मध्ये भाजपने येथील सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. याच सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात २३ ते २६ जागा इंडिया आघाडीला मिळतील, असा अंदाज आहे.
एबीपी सी व्होटर सर्वेक्षाणामध्ये मध्ये इंडिया आघाडीला महाराष्ट्रात २० जागा देण्यात आल्या असून युतीला ४२ टक्के मते मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी एनडीए आघाडीला ४३ टक्के मतांसह २८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. न्यूज १८ च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात इंडिया आघाडीला ४१ तर एनडीएला ७ जागा मिळू शकतात. टाईम्स नाऊ ईटीजीनुसार, महाराष्ट्रात महायुतीला ३४ ते ३८ आणि इंडिया आघाडीला ९ ते १३ जागा मिळू शकतात. इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या सर्वेक्षणात एनडीएला ५३ टक्के मतांसह ३५ जागा आणि इंडिया आघाडीला ३५ टक्के मतांसह १३ जागा देण्यात आल्या आहेत. इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात एनडीए ला ४०.५ टक्के मतांसह २२ जागा आणि इंडिया आघाडीला ४४.५ टक्के मतांसह २६ जागा मिळतील.
महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीचा भाग होते. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन गटात विभागले गेले नव्हते. भाजप आणि शिवसेनेच्या एनडीए युतीला ४१ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी २३ जागा भाजपच्या वाट्याला तर १८ जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या. राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला १ जागा मिळाली होती.