डॉ. प्रवीण घाडीगावकर यांनी केले मार्गदर्शन
डोंबिवली : डोंबिवलीत हजारो नागरिकांची गर्दी झालेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच उत्तम आरोग्यासाठी ह्रदयरोग व मधुमेहाबाबतही जनजागृती करण्यात आली. माधवबाग क्लिनिकचे डॉ. प्रवीण घाडीगावकर यांनी तारुण्यातही ह्रदयरोगाचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन केले.
आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीतील संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात सुरू असलेल्या आगरी महोत्सवातील सातव्या दिवशी डॉ. प्रवीण घाडीगावकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.
बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या ह्रदयरोग व मधुमेहाचा धोका वाढला आहे. एखादी व्यक्ती फिट दिसत असतानाही, त्याला अचानक ह्रदयरोगाचे निदान होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने काळजी घेण्याची गरज आहे. ह्रदयाच्या कार्यात अडथळा आणण्यासाठी मोठे शत्रू हे वजन, वाढलेला रक्तदाब आणि साखर आहेत. ते नियंत्रणात न आल्यास पुढील चार ते पाच वर्षात ह्रदयाचा त्रास होऊ शकतो.त्यामुळे आजारी पडण्याआधीच ह्रदयरोग व मधुमेह होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. घाडीगावकर यांनी केले. दररोज दोन किलोमीटर अंतर अर्ध्या तासात चालल्यानंतर तुम्हाला धाप लागल्यास ह्रदयाची तपासणी आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. घाडीगावकर यांनी केले.
ह्रदयविकाराचा ह्रदयाकडून सिग्नल दिला जातो. तो ओळखून वेळीच उपचार करावेत. चालताना लागलेली धाप, छातीत वेदना आणि पायावरील सूज येत असल्यास तुमच्या ह्रदयातील ताकद कमी झाल्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत ह्रदयविकाराचा धक्का बसल्यास जीवावर बेतू शकते, ते ध्यानात घेऊन प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी. दररोज चालण्याबरोबरच आहारात बदल करावेत. वजन वाढणार नाही, असा आहार घ्यावा. मीठ, साखर, मैदा व तेलाचे प्रमाण कमी करावे. आपल्या जीवनशैलीत बदल केल्यास ह्रदयरोग व मधुमेहाला दूर ठेवता येईल, असे आवाहन डॉ. घाडीगावकर यांनी केले.
भारत ही मधुमेहाची राजधानी झाली आहे. शत्रू राष्ट्राने हल्ला करण्यापेक्षा भविष्यात मधुमेहामुळे नागरिकांना अनेक व्याधींचा सामना करावा लागेल, अशी भीती डॉ. घाडीगावकर यांनी व्यक्त केली.
या महोत्सवासाठी आगरी युथ फोरमच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिलीप देसले, संतोष संते, गुरुनाथ म्हात्रे, कांता पाटील, अशोक पाटील, सदा म्हात्रे, नारायण म्हात्रे, जयेंद्र पाटील यांच्याकडून मेहनत घेतली जात आहे.
000