नवी मुंबई : महानगरपालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राव्दारे दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून 3 डिसेंबर रोजीच्या जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये समाजामध्ये दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणे तसेच दिव्यांग मुलांना प्रोत्साहित करणे या हेतूने अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या अंतर्गत 3 डिसेंबर 2024 रोजी दिव्यांगत्वाबाबत जनजागृतीकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नमुंमपा इटीसी केंद्रातील कर्मचारी, केंद्रातील विविध प्रवर्गातील दिव्यांग मुले व त्यांचे पालक तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी उपस्थित होते.
या रॅलीचा प्रारंभ सकाळी 9.30 वाजता इटीसी केंद्रामधून करण्यात आला. इटीसी केंद्र ते वाशी स्टेशन परिसर येथे रॅली आली असता मानवी साखळी करून दिव्यांगत्वाबाबत माहिती दर्शविणारे फलक व घोषणा याव्दारे दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यात आली. या रॅलीची सांगता पुन्हा इटीसी केंद्रामध्ये येऊन करण्यात आली. रॅलीनंतर दिव्यांग मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
6 डिसेंबर 2024 रोजीमती दीपाली खवले, असिस्टंट प्रोफेसर, डी.वाय पाटील युनिव्हर्ससिटी स्कूल ऑफ लॉ, नेरूळ यांनी ‘दिव्यांग हक्क अधिनियम 2016’ या विषयावर दिव्यांग मुलांच्या पालकांकरिता माहितीपूर्ण व्याख्यान दिले. 9 डिसेंबर 2024 रोजी इटीसी केंद्राव्दारे दिव्यांग मुले, पालक व शिक्षक यांची नेरूळ येथील वंडर्स पार्क येथे भेट आयोजित करण्यात आली. वंडर्स पार्कमध्ये टॉय ट्रेन व इतर खेळाच्या साधनांचा दिव्यांग मुलांनी मनमुराद आनंद घेतला. यावेळी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कर्मचारी व त्यांच्या येथे शिकत असणा-या दिव्यांग विदयार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले होते. येथील लाईट अँड म्युझिक शो मुलांकरिता अतिशय आनंददायी होता.
डिसेंबर महिन्यात आयोजित विविध उपक्रमांत मुलांसाठीचा आवडीचा उपक्रम म्हणजे वेशभूषा स्पर्धा 13 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आली. यावेळी दिव्यांग मुलांनी विविध प्रेरणादायी व्यक्तींच्या वेशभूषा धारण करून विविध संदेश दिले. 23 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या ख्रिसमस पार्टीने या महिन्यातील विविध उपक्रमांची हसत खेळत सांगता झाली. हे सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तीबध्द रितीने नियोजनानुसार पार पाडण्यासाठी इटीसी केंद्रातील सर्व निमवैदयकीय कर्मचारी, विशेष शिक्षक व इतर कर्मचा-यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमांवर नियंत्रण व देखरेखीचे काम इटीसी केंद्रातील शैक्षणिक व्यवस्थापकांनी केले. सर्व कार्यक्रमांच्या आयोजनासाठी केंद्राच्या संचालिका उपआयुक्तम. संघरत्ना खिलारे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
