ठाणे : तुळशीधाम येथील धर्मवीरनगर परिसरात सात वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
धर्मवीरनगर येथे एमएमआरडीएच्या इमारती आहेत. या इमारतीजवळील काही वृक्ष तोडल्याबाबतची तक्रार सुमारे २० दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीनंतर महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दोन सप्तपर्णी, दोन जंगली उंबर, दोन जंगल चेरी आणि एक अज्ञात वृक्ष असे एकूण सात वृक्ष तोडण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले.
अधिकाऱ्यांनी याबाबत वृक्षांची लाकूड वाहून नेणाऱ्यांची चौकशी केली असता, चार जणांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण विभागाने चितळसर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केला होता. याबाबत आता तक्रारी अर्जानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. झाडांचे संवर्धन आणि जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ (१), २१ (२), ८ आणि महाराष्‍ट्र मालमत्‍ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *