ठाणे : 25 ठाणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत असलेल्या 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप पथकाने रविवारी सुट्टीच्या दिवशी तलावपाळी येथे मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. सुट्टीनिमित्त फिरावयास आलेल्या नागरिकांनी या जनजागृती मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
तलावपाळी हा ठाणे शहरातील एक वर्दळीचे व संध्याकाळचा फेरफटका मारण्याचे आवडते ठिकाण आहे. येथील नौकावहन सुविधेचा आनंद घेण्यासाठी ठाणेकर खास वेळ काढून येतात आणि त्यात रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असला की येथे तलावपाळीच्या चारही बाजूनी गर्दीच गर्दी असते. भारतातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांना अधिक महत्व आहे. नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व जास्तीस्त जास्त मतदान टक्का वाढला पाहिजे आणि कोणताच घटक मतदान करण्यासापासून वंचित राहू नये, या उद्देश्याने 148 ठाणे विधानसभा मतदार संघाच्या स्वीप पथकाने तलावपाळी येथे मतदान जनजागृतीचे फलक घेऊन मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देऊन जनजागृती केली.
नागरिकांनी ही स्वीप पथकाला प्रतिसाद दिला व मतदान जनजागृती अभियान कार्यक्रमात सामील झाले. या ठिकाणी नौकावहनसाठी नागरिक गर्दी करत होते, म्हणून स्वीप पथकाने ही नागरिकांसोबत नौका विहार करत मतदान जनजागृती संबंधी मोठ्या आवाजात घोषणा देत मतदान जनजागृती केली.
लोकशाहीच्या उत्सवात लोकशाही सक्षम होण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान केलेच पाहिजे. मतदानाचा हक्क मिळाला आहे, तर मतदान करण्याचे कर्तव्य सर्वांनी जबाबदारीने पार पाडले पाहिजे. मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वांनी न चुकता दिनांक 20 मे 2024 रोजी अवश्य मतदान करावे, असे आवहान सर्व नागरिकांना यावेळी स्वीप पथकाच्या वतीने करण्यात आले.
हा मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
