ठाणे- 3१ डिसेंबर म्हणजे दारू, नशा आणि अमली पदार्थांचा जल्लोष, अशी विकृत मानसिकता समाजात रुजवली गेली आहे. ‘मज्जा’च्या नावाखाली व्यसनांची पायाभरणी याच दिवशी केली जाते. या अपप्रवृत्तीला ठामपणे नकार देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, घाटकोपर शाखेने भटवाडी पार्सेकर चौक,भटवाडी येथे ३१ डिसेंबर रोजी ‘द-दारूचा नाही, द-दुधाचा’ हा विवेकवादी आणि माणूसकेंद्री उपक्रम राबविला.
सरत्या वर्षाला निरोप देताना नशेचा आधार न घेता, आणि नववर्षाचे स्वागत विवेक, आरोग्य व सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून करता येते, हे कृतीतून दाखवून देण्यासाठी मसाला दूध वाटप करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दारूच्या ग्लासऐवजी दुधाचा कप हातात घेत नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
माणसाला कमकुवत करणाऱ्या व्यसनांऐवजी माणसाला सक्षम करणाऱ्या सवयी अंगीकारण्याचा संदेश देणारा हा उपक्रम समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरला. नशेमुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे, तुटणारे नातेसंबंध आणि वाढणारे सामाजिक प्रश्न यावर उपाय म्हणजे व्यसनमुक्ती हाच आहे, हे या उपक्रमातून ठळकपणे अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, घाटकोपर शाखेचे अध्यक्ष केतन शहा, अंनिसचे राज्य नंदकिशोर तळाशीलकर, राज्य प्रधान सचिव विजय परब यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व गायक गौतम हराळ, काँग्रेसचे हिरालाल हरिआ, भुषण देसाई, मनोज राजभर, नितीन गांगर तसेच राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन घाटकोपर शाखेचे आगामी कार्याध्यक्ष शहाजी पाटोदेकर यांनी केले. नीलिमा जाधव यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची प्रबोधनपर गीते सादर करत उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. तसेच प्रधान सचिव अनंत जोशी, प्रफुल रणदिवे, संदेश बालगुडे, संदेश खळे, कैलास भद्रिके, अरुण सातव, छाया धनवे, गोविंद सावंत, राज जाधव, विलास पाटोदेकर, इरा, मनश्री, सतीश पाटोदेकर आदी अनेक कार्यकर्ते ठामपणे या उपक्रमात सहभागी झाले. नववर्ष नशेत नाही, विवेकात साजरे करूया! हा स्पष्ट संदेश देणारा हा उपक्रम चळवळीच्या भूमिकेला साजेसा आणि समाजात विवेकाची मशाल पेटवणारा ठरला.
००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *