दोन दिवसांपूर्वीच संपूर्ण जगाने नववर्षाचे उल्हासात स्वागत केले. महाराष्ट्र देखील तिथे मागे नव्हता. मुंबईच्या चौपाटीपासून तर थेट इकडे गडचिरोली आणि तिकडे रत्नागिरी पर्यंत सर्वत्र नागरिकांनी जल्लोष करत सरत्या वर्षाला निरोप दिला, आणि नव्या वर्षाचे स्वागत केले. यावेळी अनेकांच्या हातात मद्याचे फेसाळलेले प्याले होते, आणि त्या मद्याच्या धुंदीत सर्वांनी नववर्षाचे स्वागत केले.
मात्र याला अपवाद ठरला तो मुंबईतील घाटकोपर परिसर. येथे भटवाडीतल्या पार्सेकर चौकात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी फेसाळलेल्या मद्याचे प्याले उंचावतच नाचायला हवे, ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी “द दारूचा नव्हे तर द दुधाचा” हा विवेकवादी उपक्रम राबवला गेला.
नववर्षाचे स्वागत करायचे ते मद्यपान करून आणि जल्लोष करूनच ही खरोखरीच एक अंधश्रद्धा आहे. खरे तर दारू ही मानवी शरीरासाठी तर हानिकारक आहेच पण त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य जपण्याच्या दृष्टीने देखील हानिकारकच आहे. मात्र तरीही मद्यपान ही फॅशन झाली आहे, नव्हे तो स्टेटस सिम्बॉल झाला आहे. आजकाल पिणाऱ्यांसाठी आनंद व्यक्त करायचा तरीही दारू, आणि दुःखात बुडून जायचे असेल तरीही दारूच आधार ठरते आहे. म्हणतात ना “पीने वालो को पीने का बहाना चाहिए”. यामुळे अनेक आयुष्ये बरबाद झालेली आपण बघतो आहोत. अनेक संसार उध्वस्त झालेले आहेत. तरीही आम्ही द दारूचा म्हणूनच अभिमानाने सांगतो.
ही अंधश्रद्धा संपवण्यासाठीच घाटकोपरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हाती घेतलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद म्हणावा लागेल. दारू हे पेय शरीरासाठी हानिकारक आहे, तर दूध हे शरीर संवर्धन करण्यासाठी उपयोगी मानले गेले आहे. मूल जन्माला येते तेव्हा सुरुवातीचे काही महिने तरी आईच्या दुधावरच जगत असते. नंतर त्याच्या शरीराची निरोगी वाढ होण्यासाठी त्याला गाईचे दूध नियमित पाजले जात असते. त्यामुळेच मग गुटगुटीत सशक्त मुले तयार होतात. दूध हे फक्त शरीरासाठीच उपयोगाचे असते असे नाही तर त्यामुळे तुमचे बुद्धीवर्धनही होते. म्हणूनच दूध हे पृथ्वीवरचे अमृत म्हणून मानले गेले आहे.
त्यामुळेच आपल्या संस्कृतीत कोजागिरीच्या रात्री मसाला दूध पिण्याची परंपरा आहे. तीच परंपरा घाटकोपरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३१ डिसेंबरच्या रात्री राबवली. त्यांनी सर्वांनाच देशी विदेशी मद्याऐवजी मसाला दूध दिले आणि उपस्थित नागरिकांनी देखील दुधाचे ग्लास उंचावत चिअर्स करीत नववर्षाचे स्वागत केले. खरे तर हा उपक्रम आता पुढच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जायला हवा. “दारूला पर्याय दुधाचाच” ही संकल्पना प्रस्थापित आणि प्रतिष्ठित करायलाच हवी.
यावरून एक आठवले पत्रकारांना खुश करण्यासाठी राजकीय नेते आणि मोठे उद्योगपती रात्री दारूच्या पार्ट्या आयोजित करीत असतात. अशा पार्ट्यांना बोलावले जाणे हा देखील पत्रकारिता जगतात एक सन्मान समजला जातो. मात्र ही प्रथा तोडली जावी असे मानणारेही काही राजकीय नेते आहेत. त्यातलेच एक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. त्यांनी विदर्भात दुग्ध व्यवसाय वाढावा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा म्हणून दिल्लीची मदर्स डेअरी विदर्भात आणली. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित एका पत्र परिषदेत बोलताना गडकरींनी सुचवले “आता इथे इतके मुबलक दूध उत्पादन होईल, की तुम्हा पत्रकारांच्या रात्रीच्या पार्ट्यांमध्ये दारू ऐवजी मसाला दूध देणे सुरू करता येईल.” अर्थात गडकरींच्या या सूचनेवर रोज रात्री कुठेतरी ‘सोय’ बघणाऱ्या पत्रकारांनी नाक मुरडले, हा भाग वेगळा. मात्र उर्वरितांनी या सूचनेचे स्वागतच केले.
म्हणूनच आता “द दारूचा नव्हे तर द दुधाचा” हा निर्णय उभ्या महाराष्ट्राने घ्यायला हवा आणि तो राबवायलाही हवा. “दारूला पर्याय दुधाचा” ही संकल्पना प्रतिष्ठित करायला हवी. अर्थात तसे झाले तर मद्य निर्मिती करणारे कारखानदार अस्वस्थ होतील, बारमालक देखील रस्त्यावर येतील. मात्र त्यांची पर्वा न करता महाराष्ट्राने हा निर्णय राबवावा उद्याचा. सुदृढ आणि सक्षम महाराष्ट्र निर्माण करण्याची ती सुरुवात असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *