गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘इंडिगो’ला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. विलंब आणि हजारो उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यासंदर्भातील ‘डीजीसीए’चा तपास अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे. त्यात ऑपरेशन्सचे अत्यधिक ऑप्टिमायझेशन, क्रू आणि विमानांसाठी अपुरा बॅकअप आणि नवीन एफडीटीएल नियमांची अयोग्य अंमलबजावणी आढळून आली. ‘डीजीसीए’ने ‘इंडिगो’च्या ‘सीईओ’ला इशारा दिला आहे, एसव्हीपी (ओसीसी)ना ऑपरेशनल जबाबदाऱ्यांमधून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मोठ्या प्रमाणात उड्डाण व्यत्ययासाठी ‘डीजीसीए’ने ‘इंडिगो’ला 22.2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
‘डीजीसीए’च्या चौकशी अहवालात सॉफ्टवेअर आणि व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींचा उल्लेख आहे. त्यात उघड झाले आहे, की क्रूवर जास्त ताण होता आणि त्यांचे ड्युटी तास जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले. ‘डेड-हेडिंग’, ‘टेल स्वॅप’ आणि कामाचे जास्त तास यासारख्या घटना उघडकीस आल्या. शिवाय, ‘क्रू’ला खूप कमी विश्रांती देण्यात आली होती. ‘फ्लाइट ऑपरेशन्स’ आणि ‘क्रू प्लॅनिंग’मध्ये सहभागी असलेल्या इतर अधिकाऱ्यांनाही इशारा देण्यात आला आहे.
डिसेंबर 2025 मध्ये 2,507 इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली. 1,852 उड्डाणे उशिरा झाली. विविध विमानतळांवर अडकलेल्या तीन लाखांहून अधिक प्रवाशांची गैरसोय झाली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या (एमओसीए) प्रतिसादात ‘डीडीसीए’ने ‘इंडिगो’च्या कामकाजातील व्यत्ययांच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी आणि मूल्यांकन करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली. चौकशी समितीला आढळून आले, की व्यत्ययांची प्राथमिक कारणे अत्याधिक ‘ऑपरेशनल ऑप्टिमायझेशन’, अपुरी नियामक तयारी, ‘सिस्टीम सॉफ्टवेअर सपोर्ट’मधील कमतरता आणि ‘इंडिगो’च्या व्यवस्थापन संरचनेतील आणि ऑपरेशनल नियंत्रणांमधील कमतरता होती.
समितीला असेही आढळून आले, की ‘इंडिगो’चे व्यवस्थापन कमतरता ओळखण्यात, ‘ऑपरेशनल बफर’ राखण्यात आणि सुधारित ‘फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन’ (एफडीटीएल) तरतुदी प्रभावीपणे अंमलात आणण्यात अयशस्वी ठरले. या त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात उड्डाण विलंब झाले तसेच अनेक विमाने रद्द झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. तपासात असेही आढळून आले, की क्रू, विमान आणि नेटवर्क संसाधनांच्या इष्टतम वापरावर जास्त लक्ष केंद्रित केले गेले. त्यामुळे रोस्टर बफर मार्जिन लक्षणीयरीत्या कमी झाले. ड्युटी कालावधी जास्तीत जास्त करण्यासाठी क्रू रोस्टरची रचना करण्यात आली होती.
त्यात डेड-हेडिंग, टेल स्वॅप, विस्तारित ड्युटी पॅटर्न आणि किमान रिकव्हरी मार्जिनवर जास्त अवलंबित्व होते. याचा रोस्टरवर परिणाम झाला. परिणामी ऑपरेशन्सवर परिणाम झाला.
