नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. साडे चार कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात आल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. अमेरिकी टॅरिफमुळे संकटात असलेल्या वस्त्रोद्योगाला त्यांनी भेट दिली, त्यानंतर त्यांनी ट्वीट करुन अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच याच मुद्यावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे.
साडेचार कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात
पन्नास टक्के अमेरिकी टॅरिफ आणि अनिश्चिततेमुळे भारतातील टेक्सटाईल निर्यातदारांना खूप मोठा फटका बसत आहे. नोकऱ्या जाणे, कारखाने बंद पडणे आणि ऑर्डर्स कमी होणे हे आपल्या ‘मृत अर्थव्यवस्था’ चे वास्तव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत कोणतीही सवलत दिलेली नाही किंवा टॅरिफबाबत एक शब्दही उच्चारलेला नाही, साडेचार कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात आहेत. मोदीजी, तुम्ही जबाबदार आहात; कृपया या विषयाकडे लक्ष द्या असे ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.
