गांधीहत्या झाली, पण गांधीविचार अजरामर – राजन राजे
ठाणे : ३० जानेवारी — अहिंसेचे पुजारी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची याच दिवशी एका अधम प्रवृत्तीच्या माथेफिरूने कट रचून निर्घृण हत्या केली. मात्र, ७८ वर्षांपूर्वी महात्मा गांधींची हत्या झाली असली, तरी गांधीवाद आणि गांधीविचार कधीच संपले नाहीत आणि कधीच संपणार नाहीत, असे ठाम मत धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी व्यक्त केले.
आज संपूर्ण जग जागतिक तापमानवाढीसारख्या भीषण संकटामुळे भयग्रस्त आहे. भांडवली आणि नववसाहतवादी प्रवृत्तीमुळे जग अस्वस्थ व अशांत झाले आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण मानवजातीला वाचवू शकतो तो केवळ गांधीविचारच आहे, हे आता जगालाही प्रकर्षाने जाणवू लागले आहे, असे राजे म्हणाले. महात्मा गांधींच्या या वैश्विक विचारांचा प्रसार करण्यासाठी धर्मराज्य पक्ष, ठाणे जिल्हा काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती या समविचारी पक्ष व संघटनांच्या वतीने ३० जानेवारीला सायंकाळी ५ वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे आणि डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे हे मान्यवर ‘गांधी विचारविश्वा’वर सखोल प्रकाश टाकणार आहेत. यावेळी समाजघातक, राष्ट्रद्रोही आणि अतिरेकी उजव्या शक्तींच्या भूमिकेचाही सडेतोड समाचार घेतला जाणार आहे. या व्याख्यानातून सर्वसामान्यांना फारशी माहिती नसलेली गांधींची खरी ओळख समोर येणार असून, गांधीहत्येमागील नेमके सत्यही उलगडले जाणार आहे. आतापर्यंत ढोंगी व जात्यंध हिंदुत्ववादी प्रवृत्तींनी गांधी आणि त्यांच्या हत्येबाबत पसरवलेल्या अफवा सप्रमाण, पुराव्यांसह खोडून काढण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे, अशी माहिती राजन राजे यांनी दिली.
राष्ट्रपित्यांचे काळाच्या कसोटीवर तग धरून उरणारे महान कार्य आणि संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, तसेच त्यांच्या हौतात्म्यातून अंशतः तरी उतराई होता यावे, या उद्देशानेच “गांधीहत्या आणि आपण…” या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही राजन राजे यांनी केले आहे.
