विरोधक सतत अपयशी का ठरताहेत?
अलिकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकांमधील भाजपचा विजय जितका पक्षाच्या संघटनशक्तीचा, प्रचारतंत्राचा आणि सत्तेतील अधिकारांचा आहे, तितकाच इतर राजकीय पक्षांच्या अपयशाचाही आहे. विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष जनतेच्या अपेक्षांना पुरेसे उत्तर देऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती या निकालातून समोर येते. त्यामुळे भाजपचा विजय म्हणजे केवळ ‘समर्थन’ नव्हे, तर अनेक अर्थांनी जुन्या राजकारणाचा, विस्कळीत नेतृत्वाचा आणि जनतेशी तुटलेल्या संवादाचा विजय आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल पाहिले तर केवळ पक्षांचे यश-अपयश नव्हे, तर राज्याच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक वाटचालीबाबत अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात. विशेषतः महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कामगिरीकडे पाहिले तर महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत मागे पडत चालला आहे, हे स्पष्टपणे दिसते.
महानगरपालिका आणि नगरपालिकांची मुख्य जबाबदारी रस्ते, साफसफाई, पाणीपुरवठा, आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण ही आहे. मात्र मुंबईसह अनेक शहरांमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. दिवसेंदिवस कचऱ्याचे डोंगर वाढत आहेत. पाणीपुरवठा अनियमित आहे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढतो आहे. पाच वर्षे मुंबई आणि राज्यात भाजपाचे सरकार असूनही या मूलभूत प्रश्नांवर ठोस आणि दीर्घकालीन उपाय झालेले दिसत नाहीत. त्यामुळे ‘भाजपाला मत म्हणजे विकासाला मत’ हा दावा प्रत्यक्ष वास्तवाशी विसंगत आहे. खरे तर, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका वेळेवर न होणे ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक आहे. गेली पाच वर्षे प्रशासकांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालवला जाणे म्हणजे जनतेच्या थेट सहभागाला मर्यादा घालणे होय. तरीही या मुद्द्यावर फारसा जनआक्रोश किंवा राजकीय दबाव दिसून आला नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे अधिकाधिक झुकत चालले आहे हे दिसून येते. एमआयएमचा वाढता प्रभाव हा त्याचाच परिणाम आहे. धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणामुळे मुस्लिम मतदारांपुढे ‘आपण कोणत्या राजकीय प्रवाहाकडे जायचे?’ हा प्रश्न उभा राहिला. मुख्य प्रवाहातील पक्षांकडून धर्मनिरपेक्षतेची ठाम भूमिका आणि विश्वास निर्माण न झाल्यामुळे मुस्लिम मतदारांनी आपला राजकीय प्रश्न स्वतःच्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एमआयएमला बळ मिळाले. केवळ एका पक्षाची वाढ म्हणून न पाहता, व्यापक राजकीय अपयश म्हणून याकडे पहा लागेल.
मराठी भाषिकांची मुंबईमधील टक्केवारी आज कमी होत आहे आणि त्याचा परिणाम राजकारणावरही दिसतो. 1995 पासून सेना-भाजपाच्या सत्ताकाळात हा बदल सातत्याने घडत गेला. आज अशी स्थिती आहे, की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी त्यांच्या राजकीय प्रभावात फारशी वाढ झालेली दिसत नाही. मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा आणि या वेळी जिंकलेल्या जागा जवळपास समान आहेत. म्हणजेच त्यांनी आपली स्थिती टिकवली, पण त्यात वाढ करता आली नाही. त्यामुळे हा निकाल अमराठी मतदारांच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक आहे, असे म्हणावे लागते. कामगार वर्गाचे प्रश्न या निवडणुकीत पूर्णपणे दुर्लक्षित राहिले ही गोष्ट नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखी नाही. विचारात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे,महागाई, रोजगाराची असुरक्षितता, कंत्राटी पद्धतीने होणारे काम, स्थलांतरित कामगारांचे प्रश्न या सगळ्यांवर कुठल्याही पक्षाने ठोस भूमिका मांडलेली दिसत नाही. निवडणूक निकालांवर कामगारांचा प्रभावही जाणवलेला नाही आणि कामगारांचे प्रतिनिधित्व करणारा चेहराही फारसा पुढे आलेला नाही. मराठवाड्यातील लातूर, औरंगाबाद, परभणीसारख्या भागांमध्ये अजूनही सहा-सात दिवसांमध्ये एकदा पाणी मिळते. पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. प्लास्टिक कचऱ्याचे डोंगर वाढत आहेत. तरीही विकासाच्या प्रश्नांपेक्षा धार्मिक मुद्द्यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची बाब चिंताजनक आहे.
ताजे निवडणूक निकाल पाहता महाराष्ट्र फुले-आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारधारेपासून दूर जाऊन अधिकाधिक धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळत आहे, असे वाटते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांबरोबर एकत्र येण्याचा केलेला प्रयत्नही जनतेला फारसा पटलेला दिसत नाही. अल्पसंख्याक मुस्लिम मतदारांना सध्याच्या सरकारचे धर्माधारित राजकारण स्पष्ट जाणवत असल्याने एमआयएमशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, ही स्थिती लोकशाहीसाठी धोक्याची आहे. इतर पक्षांचा पराभव हा केवळ निवडणूक रणनीतीचा पराभव नाही, तर वैचारिक अपयशही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष विकास, सामाजिक न्याय आणि समावेशकता याबाबत ठोस, विश्वासार्ह भूमिका मांडण्यात कमी पडल्याचे दिसते. त्यांच्या राजकारणात अनेकदा केवळ सत्तेसाठीची गणिते, आघाड्या आणि अंतर्गत संघर्ष दिसून आले. परिणामी, ‘हा पक्ष माझ्यासाठी नेमके काय करणार?’ या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळाले नाही. धर्मनिरपेक्षता आजही आवश्यक आहे, पण तिच्या खुणा अधिकाधिक अस्पष्ट होत चालल्या आहेत. विरोधकांची एकजूट न होणे, महाविकास आघाडी एकत्र लढू न शकणे, हेही भाजपाच्या यशामागचे मोठे कारण आहे. म्हणूनच हे निकाल महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याबाबत अनेक धोक्याच्या सूचना देतात; ज्या गांभीर्याने समजून घेणे आज अत्यावश्यक आहे. एकूणच, भाजपचा महाराष्ट्रातील विजय ही बहुआयामी घटना आहे.
या विजयाकडे फक्त टाळ्यांच्या गजरात न पाहता, शांतपणे, चिकित्सक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. कारण शेवटी प्रश्न एका पक्षाचा नसून महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याचा आणि लोकशाहीच्या आरोग्याचा आहे. भविष्यात महाराष्ट्राचे राजकारण अधिकाधिक ध्रुवीकरणाकडे जाईल की समतोलाकडे, हे आज घेतल्या जाणाऱ्या भूमिकांवर अवलंबून आहे. भाजपने विजयाचा उपयोग सर्वसमावेशक विकासासाठी केला, संवाद वाढवला आणि भीतीऐवजी विश्वास निर्माण केला, तर हा विजय सकारात्मक ठरू शकतो. पण विजयाचा अर्थ फक्त वर्चस्व, दबाव आणि विरोधकांना संपवणे असाच घेतला गेला, तर सामाजिक व्यवस्थेतील दरी अधिक खोल होण्याची शक्यता आहे.
(अद्वैत फीचर्स)
