दादागिरी आणि पैशाची भाषा करणाऱ्या उमेदवारांना आता जनता माफ करणार नाही: विलास फडके
राज भंडारी
पनवेल: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच आदई पंचायत समिती गणातून शेतकरी कामगार पक्षाचे अनुभवी नेते विलास फडके तसेच नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा हे मैदानात उतरले आहेत. आपल्या आयुष्याची अनेक वर्षे ज्यांनी समाजसेवा करण्यात खर्ची घालविली त्या विलास फडकेंसोबत जनशक्ती आणि विरोधात धनशक्ती अशी निवडणूक रंगत आहे.
मागील निवडणुकीत ज्यांनी धनशक्तीच्या जोरावर ही जागा जिंकली ते गेल्या ८ वर्षात मतदार जनतेकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे जनतेने आता ठरवले आहे. धनशक्तीला तालुक्यातील जनता आता जनशक्तीचा अवतार दाखवणार असल्यामुळे आदई पंचायत समिती गणातून जनता विलास नारायण फडके आणि नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा असे आम्हा दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास नारायण फडके यांनी प्रचारादरम्यात व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील वेळी जनतेने धनशक्तीच्या जोरावर भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले होते. मात्र पुन्हा निवडणूक लागण्यासाठी ८ वर्षांचा कालावधी लागला. गेल्या ८ वर्षात आम्ही ज्यांना मतदान केलं ते आमच्याकडे फिरकलेच नाहीत, असा सुर मतदार जनतेने लावला आहे. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या मतदार संघातील जनतेसाठी असणाऱ्या विविध योजना, सवलती या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे उमेदवार अपयशी ठरले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे भाजपच्या वतीने दादागिरी आणि पैशाची भाषा करून जनतेला गृहीत धरणाऱ्यांना आता जनता माफ करणार नसून महाविकास आघाडीच्या खटारा चिन्हावरील उमेदवारांना जनता मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास फडके यांनी व्यक्त केला.
