कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला पक्ष… दादांनी दिलेला विचार घेऊन पक्ष पुढे नेऊ ही आमची भूमिका राहिल आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत – सुनिल तटकरे
कुणाला आमच्यावर आरोप करायचे आहे त्यांना करु दे, आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादांनी पक्षाचा परिवार उभा केला त्या निर्णयाशी सुसंगत भूमिका घेत आहोत…
पार्थ पवारांनी दादांच्या खुर्चीला मिठी मारली आणि अश्रूंचा बांध फुटला…
दादांच्या अस्थी नेताना पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर…
मुंबई दि.१ फेब्रुवारी – आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केली नाही. कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला पक्ष… दादांनी दिलेला विचार …घेऊन पक्ष पुढे नेऊ ही आमची भूमिका राहिल आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे आज अस्थी कलश पूजनासाठी प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांशी संवाद साधला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. काल सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावर प्रत्येकजण आपली मते मांडू शकतो, त्यांना तो अधिकार आहे पण महाराष्ट्राला सावरण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्यासाठी अजितदादांचे विकसित महाराष्ट्र हे स्वप्न दृढ करण्यासाठी वहिनींनी शपथ घेतली.त्यामध्ये कुणाला गैर वाटण्यासारखे काही नाही असा टोलाही सुनील तटकरे यांनी लगावला.
आमच्या पक्षाचा राज्यसभेतील उमेदवार कोण करायचा हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे.भाजपने नेहमीच आम्हाला सहकार्य केले आहे. पक्षाचे मंत्रीमंडळ करत असताना व इतर निर्णय करत असताना भाजपने आम्हाला सूचना केल्या नाहीत उलट मित्र पक्षाला सौहार्दाने व सन्मानाने वागवावं याचं उत्तम उदाहरण आता आम्हाला एनडीएमध्ये भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाखाली अनुभवायला मिळते याचा मी साक्षीदार आहे असेही सुनील तटकरे म्हणाले.
पक्ष विलीनीकरणाची चर्चा ही अंत्यसंस्कार होण्यापूर्वी का आणि कशासाठी सुरू करण्यात आली असा प्रश्न तुम्ही का विचारु शकत नाही असा सवाल सुनील तटकरे यांनी माध्यमांना विचारला.
दादांनी कष्टाने उभा केलेला विधीमंडळ पक्ष आहे. गेली वर्षभर किंवा सहा महिने मला पक्ष विलीनीकरणाबाबत विचारणा करण्यात आली त्यावेळी आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा एक सामूहिक निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही आमच्या मुळ सेक्युलर विचारधारेशी ठाम रहात.शिव -शाहू -फुले -आंबेडकर यांच्या सामाजिक समतेशी ठाम रहात आणि मोदीसाहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेने त्यावर शिक्कामोर्तब केले त्यामुळे एनडीएसोबत राहण्याचा निर्णय कायम राहिल. या भूमिकेशी सुसंगत असतील ते निर्णय करतील तो निर्णय त्यांनी करायचा आहे. एनडीएसोबत जाण्याचा निर्णय दादांनी विचारपूर्वक घेतला होता त्या निर्णयाशी आम्ही ठाम आहोत असेही सुनील तटकरे यांनी ठामपणे सांगितले.
आम्ही पक्ष विलीनीकरणाचा विषय बोललो नाही उलट विलीनीकरणाला आमचा विरोध आहे असे सर्व ठिकाणी पसरवले जात आहे. आमच्यावर आरोप केले जात आहेत. दादांचा एक विश्वासू सहकारी म्हणून मी गेली ३० वर्ष वाटचाल करत आहे. २०१४ मध्ये दोन्ही राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो. पवारसाहेबांनी मला ४ वर्ष अध्यक्ष केला. पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिली ती निष्ठेने पार पाडली असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
दादांसोबत काम करताना त्यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका त्यांचा कार्यकर्ता व सहकारी म्हणून वारंवार घेतली. आमचा निर्णय एनडीएसोबत जाण्याचा झालेला आहे. आता ही चर्चा कुणी का सुरू केली माहिती नाही त्यामुळे याबाबत ज्यांनी ही चर्चा सुरू केली त्यांना याबाबत विचारणा करा असेही सुनील तटकरे म्हणाले.
कुणाला आमच्यावर आरोप करायचे आहे त्यांना करु दे आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादांनी पक्षाचा परिवार उभा केला त्या निर्णयाशी सुसंगत भूमिका घेत आहोत. विधीमंडळ नेता कुणाला निवडायचा हा अधिकार लोकशाहीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे.
महाराष्ट्राचे नेते आणि आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार यांचा अस्थी कलश पक्षाच्या मुख्य कार्यालयात आणण्यात आला .त्याचे विधीपूर्वक पूजन सुनील तटकरे यांनी यावेळी केले आणि आजच महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात अस्थी कलश नेले जाणार आहे. उद्या पक्षाचे मंत्री,आमदार, जिल्हाध्यक्ष हे पदाधिकाऱ्यांना बोलावून अस्थी कलश दर्शन आयोजित करतील. आणि दर्शन झाल्यानंतर त्या अस्थी नदीमध्ये त्या – त्या जिल्हयात विसर्जित करण्यात येणार आहे अशी माहितीही सुनील तटकरे यांनी यावेळी दिली.
पक्ष कार्यालयात दादांच्या अस्थी कलश पूजनासाठी युवा नेते पार्थ पवार हेही उपस्थित होते.
पार्थ पवार यांनी दादांच्या केबिनमध्ये जाऊन दादा बसत असलेल्या खुर्चीला मिठी मारली .त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. हुंदके देत पार्थ पवार यांनी दादांच्या आठवणी जागवल्या.
त्यानंतर अस्थी कलशाचे दर्शन घेतले. याशिवाय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही दर्शन घेतले.
आजपासून पक्ष कार्यालयातून प्रत्येक जिल्ह्यात दादांच्या अस्थी कलश मधून नेताना पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार सना मलिक शेख, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे आदींसह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
