खारदांडा कोळीवाड्याच्या जमिनीवरील बांधकामे नियमित करा – वर्षा गायकवाड
मुंबई: मुंबईतील खारदांडा, कोळीवाडा हा गावठाण भाग असून येथील रहिवासी अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या  गावठाण क्षेत्रातील बांधकामांबाबत स्वतंत्र व स्पष्ट नियमावली तयार होत नाही, तोपर्यंत खार दांडा कोळीवाडा येथील बांधकामांबाबत महानगरपालिका तसेच अन्य यंत्रणांकडे प्रलंबित असलेल्या सर्व तक्रारींवर कारवाई स्थगित ठेवण्याबाबत शासन आदेश काढावा आणि येथील मालकी हक्काच्या जमिनीवरील बांधकामांबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करून बांधकामे नियमित करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड म्हणतात की, कोळी समाज हा महाराष्ट्र, गुजरात आणि कोकण किनार पट्टीवरील सर्वात जुना, म्हणजे ‘आद्य’रहिवाशी मानला जातो. १५ व्या शतकापासून मुंबईच्या किनारपट्टीवर वसलेल्या या समाजाचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून, त्यांना ‘मुंबईचे मूळ रहिवासी’ म्हणून ओळखले जाते. हे समाज बांधव सागरी संस्कृती आणि परंपरांचे जतन करणारे आहेत. सदर भागातील इमारतींच्या दुरुस्ती व बांधकामाबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियमातील ठोस व स्पष्ट नियमावली अद्याप तयार झालेली नाही, त्यामुळे बांधकाम परवानगी मिळण्यास अडचणी येत असून, मालकी हक्काच्या जमिनीवरील अत्यावश्यक दुरुस्तीची कामेही करता येत नाहीत. या तांत्रिक अडचणींचा गैरफायदा घेत काही स्थानिक घटकांकडून रहिवाशांवर तक्रारी दाखल करून महानगरपालिका व न्यायालयीन माध्यमातून खंडणीची मागणी केली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. खार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल असून,संबंधित तक्रारी व पुरावे उपलब्ध आहेत. खंडणी न दिल्यास गरीब व सामान्य रहिवाशांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बेघर केले जात असल्याच्या घटना घडत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.  सरकारने याची दखल घेऊन येथील गरीब व गरजू रहिवाशांना खंडणीखोर प्रवृत्तीपासून संरक्षण द्यावे असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *