समाज विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावेत
खासदार नरेश म्हस्के यांचे आयुक्तांना निर्देश
ठाणे -ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी समाज विकास विभागाच्यावतीने समाजातील गरजू महिला तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जातात. यंदाही सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महिला व बालकल्याण समितीच्यावतीने विविध योजनांसाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे, परंतु एकूण उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. जे अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा असे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रान्वये (२ फेब्रुवारी) महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.
महिला व बालकल्याण योजनेतंर्गत विधवा / घटस्फोटीत महिलांच्या मुलींच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य करणे, कोणत्याही कारणामुळे पतीचे/ कर्त्या पुरूषाचे निधन एकल/ विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाबात योजना राबविणे आदी विविध १२ योजना असून तृतीय पंथीयासाठी देखील योजनांचा समावेश आहे. तसेच शालेय शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्त, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती, उदरनिर्वाह करिता, व्यवसायाकरिता, सहाय्यभूत साहित्याकरिता, वैद्यकीय उपचाराकरिता, बेरोजगारांना भत्ता, लग्नासाठी अर्थसहाय्य, ६० वर्षावरील दिव्यांगांना अर्थसहाय्य, बचतगट, आदी योजना दिव्यांगांसाठी राबविण्यात येतात.
सदर योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करता काही योजनांसाठी उपलब्ध तरतूदीपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले तर काही योजनांमध्ये उपलब्ध तरतूदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे निधीचे योग्य वाटप होणार नाही, कमी अर्ज प्राप्त झालेल्या योजनांचा निधी शिल्लक राहणार व जास्त अर्ज प्राप्त झालेल्या योजनांतील काही अर्जदार यापासून वंचित राहणार आहेत. तरी प्राप्त झालेल्या सर्व अर्जदारांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सर्व अर्जदारांना या योजनांचा लाभ देण्यात यावा असे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना दिले आहेत.
