भारत-चीन सीमारेषेवरुन राहुल गांधी आक्रमक
माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकचा दाखला दिल्याने संसदेत गोंधळ
नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषेचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा दाखला देत मोदी सरकारला भारतीय सीमारेषेसंदर्भाने सरकारला जाब विचारला. त्यावरुन, झालेल्या गोंधळात संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी थेट हस्तक्षेप करत राहुल गांधींना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि एकच गोंधळ उडाला.
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणाने देशाचे लक्ष वेधले. राहुल गांधी यांनी भाषणात डोकलाम आणि चीनशी संबंधित महत्त्वाच्या तथ्यांचा उल्लेख करत माजी आर्मी चीफ जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला दिला. त्यामुळे सभागृहात जोरदार चर्चा झाली.
राहुल गांधी म्हणाले की, डोकलाममध्ये चार चिनी रणगाडे भारताच्या सीमेत पोहोचले होते आणि ते फक्त 100 मीटर अंतरावर होते. एका मासिकातील लेख आणि माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा (मेमॉयर) हवाला त्यांनी ही माहिती सभागृहात दिली. ‘मी काय वाचत आहे, हे लक्ष देऊन ऐका, यावरून कोण देशभक्त आहे आणि कोण नाही हे समजेल.’ अशा शब्दात राहुल गांधींनी भारत आणि चीन यांच्या सीमारेषवरील मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. नरवणे यांचं हे पुस्तक सरकार प्रकाशित करू देत नाही आणि डोकलामशी संबंधित तथ्ये दाबले जात आहेत. सरकार सत्य समोर येऊ देत नाही, असेही राहुल गांधींनी म्हटले.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तातडीने उभे राहिले, त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर थेट आक्षेप घेतला. तसेच, अशा गंभीर आरोपांना पुराव्याशिवाय सभागृहात मांडता येणार नाही. ज्या पुस्तकाचा राहुल हवाला राहुल गांधी देत आहेत, ते अजून प्रकाशित झालेले नाही, असे राजनाथसिंह यांनी म्हटले. त्यामुळे, गृहमंत्री अमित शहा आणि इतर सदस्यांनीही हस्तक्षेप करत राहुल गांधींच्या वक्तव्याला विरोध केला. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपांनंतरही राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. तसेच, नरवणे यांच्या पुस्तकाला ‘१०० टक्के अस्सल’ असे म्हणत, जर सरकार एखाद्या पुस्तकाला प्रकाशित करू देत नसेल, तर याचा सरळ अर्थ असा आहे की, त्यात लिहिलेल्या गोष्टी सत्य आहेत, असेही ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांचा आक्षेप, सभागृहात गदारोळ
सत्ताधारी आणि राहुल गांधी यांच्यातील खडाजंगीनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संबंधित पुस्तक सभागृहात ठेवण्याचा आग्रह धरला. राहुल गांधी यांच्या ४६मिनिटांच्या भाषणात, त्यांना सातत्याने राजनाथ सिंह, अमित शाह, राजकिशोर रिजिजू, निशिकांत दुबे आणि लोकसभा अध्यक्षांनी नियमांचा दाखला देत थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, झालेल्या गोंधलानंतर सभागृह काही काळ तहकूब करण्यात आले होते.

