मुंबईत १२ मुले बेपत्ता झाल्याची अफवा व्हायरल
मुंबई: अवघ्या ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र, या संदर्भात मुंबई पोलिसांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
व्हायरल संदेशांमध्ये मुंबईतील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३६ तासांत ८ ते १५ वयोगटातील आठ मुलींसह एकूण १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. शिवाजी पार्क परिसरातून चार, अंधेरी हिलमधून दोन तसेच मानखुर्द आणि बांद्रा नगर भागातून प्रत्येकी काही मुले बेपत्ता झाल्याचा आरोप या संदेशात होता. तसेच या प्रकरणामागे संघटित तस्करी नेटवर्कचा सहभाग असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. त्यावर मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्टद्वारे प्रतिक्रिया देत असे कोणतेही एकत्रित स्वरूपाचे प्रकरण घडलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. शहरात ३६ तासांत १२ मुले बेपत्ता झाल्याचा दावा तथ्यहीन असून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
