वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात
चिंचवली : वनवासी कल्याण आश्रम विद्यार्थी वसतिगृह, चिंचवली केंद्र येथे ‘रानपाखरं’ या मासिकाच्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे या अंकाचे प्रकाशन केंद्रातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात संपादिका मृदुला परचुरे यांनी ‘रानपाखरं’च्या ७५ अंकांच्या प्रवासाचा आढावा घेत मासिकाची वाटचाल उलगडून सांगितली, तर सह-संपादिका सुवर्णा भट यांनी साहित्याचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. कोकण प्रांत संघटन मंत्री प्रदीपजी पाटील यांनी संघटनेची भूमिका व कार्य यावर मार्गदर्शन केले. ज्योतीताई जपे व प्रियाताई आचवल यांनी शिक्षण आयामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. कार्यक्रमाला कोचरेकर काका (वरिष्ठ कार्यकर्ते), हेमांगी भागवत (कै. सुनीताताई गोगटे यांच्या कन्या) आणि भाटवडेकर काका (माजी पालक) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिंचवली केंद्रप्रमुख विवेक फुफाणे यांनी केले, तर समारोप प्रियाताई आचवल यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
‘रानपाखरं’ या मासिकाची सुरुवात कै. सुनीताताई गोगटे यांनी २००४ साली वनवासी मुलांसाठी केली. हा अंक वनवासी कल्याण आश्रमच्या आश्रमशाळा, वसतिगृहे आणि संस्कार केंद्रांमध्ये वितरित केला जातो. वैविध्यपूर्ण माहिती, विविध सदरं आणि आकर्षक मांडणीमुळे ‘रानपाखरं’ वनवासी, ग्रामीण व शहरी भागात लोकप्रिय ठरले असून ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा हा त्याच्या यशस्वी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
