इशान किशनचे तांडव, पाकिस्तान भस्मसात
टीम इंडियाची ‘सुपर ८’मध्ये धडक
कोलंबो- महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर इशान किशनने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरील खेळपट्टीवर अक्षरशः तांडव करत धावांचा ‘अग्निवर्षाव’ केला आणि पाकिस्तानला भस्मसात केलं. इशांतच्या बॅटीतून उसळणाऱ्या अग्नीलोळाला थांबविण्याचे धाडस पाकिस्तानच्या कोणत्याच गोलंदाजात नव्हते. चौकार षटकारांची आतषबाजी करीत इशांतने टी२० वर्ल्डकपमध्ये भारताला पाकिस्तानवर तब्बल ६१ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये प्रवेश केलाय.
सामन्यात भारताने दिलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांवर संपुष्टात आला. भारताच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेत निर्णायक कामगिरी बजावली.
प्रेमदासा मैदानाची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना पूरक होती त्यामुळे पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला पहिली फलंदाजी दिली. पाकिस्तान टीमने गोलंदाजीची सुरुवातच फिरकीने केली आणि भारताची सुरुवात धक्कादायक ठरली. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने स्वतः ऑफ-स्पिन टाकत अभिषेक शर्माला बाद केलं. त्यानंतर साईम अयूब (३/२५) आणि इतर फिरकीपटूंनी पॉवरप्लेमध्ये अचूक मारा करत भारताला रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र इशान किशनने आक्रमणाची धुरा सांभाळत प्रेमदासा स्टेडियमला अक्षरशः आपल्या ताब्यात घेतले. शहीन आफ्रिदीच्या चेंडूवर मारलेला जबरदस्त पुल, अयूब व आगा यांना फटकारलेले चौकार, तर लेग-स्पिनर अब्रार अहमद आणि शादाब खान यांना मारलेले षटकार पाक टीमचा घाम काढण्यात पुरेसे ठरले. किशनने अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४० चेंडूत ७७ धावांची खेळी साकारली.
किशनने तिलक वर्माबरोबर (२५ धावा) ८७ धावांची भागीदारी केली. मात्र अयूबच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात किशन बाद झाला आणि पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केले. अयूबने सलग चेंडूंवर तिलक व हार्दिक पंड्या (०) यांना बाद करत भारताला १२६/२ वरून १२६/४ अशा स्थितीत आणले. कर्णधार सूर्यकुमार यादव (३२) आणि शिवम दुबे (२७) यांनी संयमी फलंदाजी करत संघाला १५० पार नेले. दुबेने उस्मान तारीकला काही आकर्षक फटके लगावले, तर अखेरच्या षटकात आफ्रिदीला १५ धावा चोपत दुबे आणि रिंकू यांनी भारताला १७५ धावांपर्यंत मजल मारून दिली.
१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव भारतीय गोलंदाजांनी गुंडाळला. नियमित अंतराने बळी घेत भारताने १८ षटकांत पाकचा डाव अवगहीए ११४ धावांत रोखला आणि ६१ धावांनी दणदणीत विजय साकारला. हार्दिक, बूमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी २ विकेट घेतल्या तर कुलदीप आणि तिलकने एकेक विकेट घेतली.
कोलंबोतील सामन्यात हस्तांदोलन न करण्याची भूमिका कायम
सूर्यकुमार यादव याने रविवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेतही पाकिस्तान कर्णधार सलमान अली आगा यांच्याशी सामन्यापूर्वी नाणेफेकीदरम्यान पारंपरिक हस्तांदोलन टाळत आपली भूमिका कायम ठेवली. गेल्या वर्षी दुबई येथे झालेल्या आशिया कप स्पर्धेपासून बीसीसीआई ही भूमिका अवलंबत आहे. काश्मिरमध्ये पाकपुरस्कृत अतिरेक्यांनी २६ निरअपराध भारतीय पर्यटकांची हत्या केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी सुर्यकुमार यादवने आशियाकपमध्ये पाकिस्तानचा कॅप्टनशी हस्तांदोलन केले नव्हते.
