राज्यभरात एटीएसकडून छापे
एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली २१ ठिकाणी धाडी
अनेकजणांची चौकशी
मुंबई: एन महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यभरात तब्बल २१ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. विदर्भातील यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी एटीएसचे छापे पडल्याची माहिती आहे. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसनं सर्च ऑपरेशन राबवलं आहे. त्या अनुषंगाने राज्यभर एटीएसचे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरु झाले. या छाप्यात अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करण्यात आली होती. जी राज्यात अनेक ठिकाणी शनीवार रात्रीपासून तळ ठोकून होती. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जवळपास एटीएस २० पथक या धाडीत सहभागी झाली होती.
अत्यंत गोपनीय पद्धतीनं राज्यातल्या अनेक ठिकाणी एटीएस पथकाकडून चौकशी सुरु आहे. स्थानिक घरांमध्ये जात लोकांकडून चौकशी केल्या जात आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर एटीएससह तपास यंत्रणांनी काल मध्यरात्रीपासून राज्यात बहुतांश जिल्ह्यातीळ विविध परिसरात कारवाईला सुरुवात केली. कारवाई सुरू असताना यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला गेला होता..
