‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबईतील गुरुद्वारा प्रमुखांशी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा संवाद
अशोक गायकवाड
नवी मुंबई : २८ फेब्रुवारी व १ मार्चला सेक्टर २९ खारघर ओवे मैदान येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपन्न होणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त संपूर्ण जगभरातून मोठया संख्येने लक्षावधी नागरिक उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्वोतोपरी सेवा सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गुरुव्दारांच्या प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात संपन्न झाली. याप्रसंगी हिंद-दी-चादर कार्यक्रमाचे नमुंमपा मुख्य समन्वय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, शिक्षणाधिकारी अशोक कडुस, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरूषोत्तम जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गुरुव्दारांचे प्रमुख पदाधिकारी तेजिंदर सिंग (वाशी), इंद्रपाल भाटीया (कोपरखैरणे), सतनाम सिंग(कोपरखैरणे), मनजित सिंग (सानपाडा), इंद्रजित सिंग(तुर्भे-सानपाडा) हे प्रत्यक्ष सभागृहात व जसपाल सिंग सिध्दू (सीबीडी बेलापूर), मेहेरसिंग रंधवा व अम्रपालसिंग रंधवा (ऐरोली) हे दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते. या बैठकीची सुरुवात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनकालावर आधारित सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज यांनी गायलेल्या भक्तीगीताने करण्यात आली. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.४२ घणसोली येथे इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी विदयार्थिंनी कु.कलिना दास हिने गायलेल्या याच भक्तीगीताचे प्रसारण करण्यात आले. सध्या हे भक्तीगीत सोशल मिडीयाच्या विविध डिजीटल प्लॅटफॉर्मवरुन सर्वदूर लोकप्रिय झाले आहे. बैठकीस उपस्थित गुरुव्दाराच्या प्रमुखांनीही या लहान मुलीचे भरभरुन कौतुक केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रमाची व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगितले व महानगरपालिकेमार्फत आयोजित विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या अंतर्गत शाळांमध्ये दररोज सकाळी भक्तीगीत प्रसारण, डॉक्युमेंटरी प्रसारण तसेच प्रभात फेरी, निबंध –वक्तृत्व-चित्रकला-गायन-वाचन-घोषवाक्य अशा विविध स्पर्धांचे भव्यतम स्वरुपात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १.७५ लाखाहून अधिक विदयार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. याशिवाय आरोग्य विभागामार्फत ठिकठिकाणी १२४ आरोग्य शिबीरांचे नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत झालेल्या ५० शिबीरांमधून ७७३६ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतलेला आहे. तसेच दररोज लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत असून ११ फेब्रुवारीपासून २२ ठिकाणी झालेल्या स्वच्छता मोहीमांमध्ये ३९३८ नागरिकांनी व एनएसएस विदयार्थ्यांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मींसमवेत सहभाग घेतला आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात १४ मोठे डिजीटल होर्डिंग, ६ मोठे स्थिर होर्डिंग्ज तसेच ८० फ्लेक्स होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बसस्टॉपवरही बॅनर्सव्दारे प्रसिध्दी करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील ५ मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये २९ स्क्रिनवर शोच्या आधी सतिंदर सरताज यांचे भक्तीगीत प्रसारित करण्यात येत आहे. कार्यक्रमास मोठया संख्येने जनसमुदाय येणार असल्याने महानगरपालिकेने २ हजारहून अधिक नागरिकांची निवासव्यवस्था, ये-जा करण्यासाठी बसेस व्यवस्था, वैदयकीय आरोग्य व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, शौचालय व्यवस्था, पिण्याचे पाणी व्यवस्था अशी विविध व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. याप्रसंगी गुरुव्दारा प्रतिनिधींकडून आलेल्या सूचना जाणून घेण्यात आल्या व त्यांची त्वरित अंमलबजावणी करावी असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका संपूर्ण सहकार्य करेल असा विश्वास देत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या कामासाठी नवी मुंबई महानगरपालिकेशी थेट संपर्क साधावा असे आवाहन उपस्थित गुरुव्दारा प्रमुखांना केले.
