विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामधील भावनिक नातेसंबंधांचा स्नेहपूर्ण समन्वय ही काळाची गरज – डॉ. आनंद नाडकर्णी
अनिल ठाणेकर
ठाणे: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये भावनिक नाते संबंध यांचा स्नेहपूर्ण समन्वय असणे ही काळाची गरज आहे. शाळा, शाळेची इमारत व परिसर यांच्याबद्दल एक घट्ट नाते विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये निर्माण झालेले असते. सरस्वती सेकंडरी शाळेच्या “पेरणी ते कापणी” शेती प्रकल्पाचे कौतुक करताना प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांनी सांगितले. या समारंभास, शाळेचे माजी विश्वस्त आणि मुख्याध्यापक अशोक टिळक, मनिषा टिळक, विश्वस्त विकास दामले, विश्वस्त अनुराधा आपटे, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरस्वती मंदिर ट्रस्टच्या विमला कर्वे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी विमला कर्वे स्मृतीव्याख्यान आयोजित करण्यात येते. यंदाचे हे अकरावे वर्ष होते.विमला कर्वे यांनी ६ जून १९५२ रोजी प्राथमिक शाळा सुरू केली. ६ जून २०२६ ते ६ जून २०२७ हे शाळेचे ‘ अमृत महोत्सवी वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी वर्ष शुभारंभाची मुहूर्तमेढ विमला कर्वे यांच्या स्मृतिदिन समारंभाचे औचित्य साधून रोवली गेली. या कार्यक्रमात प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांची ‘प्रकट मुलाखत,शाळेची माजी विद्यार्थिनी हर्षदा बोरकर यांनी डॉक्टरांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना डॉक्टरांनी असे सांगितले की, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये भावनिक नाते संबंध यांचा स्नेहपूर्ण समन्वय असणे ही काळाची गरज आहे. शाळा, शाळेची इमारत व परिसर यांच्याबद्दल एक घट्ट नाते विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये निर्माण झालेले असते. सरस्वती सेकंडरी शाळेच्या “पेरणी ते कापणी” शेती प्रकल्पाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले, विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता शिक्षकांनीही समृद्ध आणि परिपूर्ण होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न करून शिकविल्यास शाळेतून सर्वांगीण विकास होऊन विद्यार्थी बाहेर पडेल आणि बाहेरील जगाच्या महाकाय व्यवस्थेशी तोंड देऊन यशस्वीपणे जीवन व्यतीत करु शकेल. यासाठी जसे दाणेदार पीक हाताशी येण्यासाठी पेरणी आणि कापणी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये खूपच फरक आहे. आज समाजामध्ये विविध प्रकारचे तणावयुक्त जीवन माणसे जगत आहेत. अशावेळी त्या तणावापासून मुक्त होण्यासाठी विविध मानसिक आणि भावनिक गोष्टीची जोड देऊन त्यावर काम करणे काळाची गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विमला कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी विश्वस्त सुरेन्द्र दिघे यांनी केले. यावेळी बोलताना श्री. दिघे सरांनी दोन्ही माध्यमातील शाळा मधील “विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या मध्ये स्नेहपूर्ण संबंध रुजवणे आणि जोपासणे हे अमृत वर्षाचे वैशिष्ट्य असणार आहे. स्नेह – संवाद आणि सन्मान हे त्रिसूत्र हे अमृत वर्षाचे ब्रीदवाक्य असणार आहे. शाळेच्या विभागवार झालेल्या शालेय समितीत घेतलेल्या निर्णयाला अनुसरून विश्वस्त मंडळाने मराठी शाळा याच इमारतीत राहिल आणि सीबीएससी शाळा नवीन तयार होत असलेल्या इमारतीत नवीन शैक्षणिक वर्षांपासून सुरू होईल. सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्यविकास, विज्ञान तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टी विविध उपक्रमांद्वारे शिकविल्या जातील. सरस्वती सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक भरत खोटरा यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
