पूर्वी फॅशन बदलायची ती कधीतरी दोन चार वर्षांनी आणि उत्सुक लोकाना कपड्यांची फॅशन कळायची ती सिनेमातून आणि मग त्यानुसार शिंप्याकडून कपडे शिवून घेतले जात. आजची दुनिया तयार कपड्यांची आहे. आकार सांगा, कपडे तयार असतात. फॅशन कशाची निघेल हे सांगता येत नाही आणि आज तर समाज माध्यमांच्यामुळे सकाळी एक तर संध्याकाळी एक अशीही फॅशन बदलू शकते. फॅशनच्या अशाच एका प्रकारात दात पांढरे शुभ्र करण्यासाठी काळ्या रंगाचीही टूथपेस्ट बाजारात आली आणि गेली. दात पांढरे करणे ही आज अब्जावधी डॉलर्स किमतीची जागतिक बाजारपेठ झाली आहे. तंबाखूची मशेरी आणि बाभळीच्या फांदीचा ‘दातून’ ही फॅशनदेखील आली असून काही जागी सुरूही आहे.
जुन्या फॅशन परत बाजारात आणल्या जातात तशी एक नवी फॅशन आणली गेली आहे. दक्षिण पूर्व आशियाच्या व्हिएतनामसारख्या काही भागात दात काळे करण्याची ही फॅशन किमान दोन हजार वर्षे जुनी असून व्हिएतनाममधील काही प्राचीन संस्कृतीमध्ये दात काळे करून घेणे हे एक सौंदर्य प्रसाधन आणि महिला सौंदर्याचा तो एक भाग मानला जात असे. आजही काही आधुनिक लोक दात काळे करून घेत असतात असे आढळले आहे. परंतु दात काळे करणे हे काही विशिष्ट पद्धातीने केले जात असे अथवा पान तंबाखू चघळण्यामुळे दात काळे होत असत हे मात्र आजही एक गूढ आहे.
या क्षेत्रातील आजचे संशोधन दातांच्या नमुन्यावरून असे दाखवते की पान तंबाखू चघळण्यामुळे दात काळे होत नाहीत. लोखंड आणि गंधक यांच्या मिश्रणातून तयार केल्या गेलेल्या एका काळ्याशार भुकटीने दात घासले तर ते काळे होऊ आणि राहू शकतात. लोखंड या धातूच्या निर्मितीच्या दोन हजार वर्शापूर्वीच्या काळाशी ही गोष्ट सुसंगत दिसते आहे. पुरातन वस्तूशास्त्राच्या तज्ञ शॅनॉन तुशिन्घम यांच्या मते यामागे काही सखोल सांस्कृतिक विचार असू शकतात.
मोत्यासारखे शुभ्र दात ही आजच्या काळात जवळजवळ आवश्यक मानली जाणारी गोष्ट असली तरी धातूंच्या काळ्या मिश्रणाने दात काळे करून घेणे यामागे निश्चित असे कारण असावे. त्या काळात आपण जनावर आणि मानवी भुते यांच्यापेक्षा वेगळे दिसण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ‘काळे दात म्हणजे हा मानव’ असे मानण्याची पद्धत असू शकेल का? या प्रश्नावर संशोधन सुरु आहे. प्राचीन व्हिएतनाममधील काही कवितांमध्ये काळ्या दातांच्या सौंदर्याविषयी उल्लेख आहेत. यू झांग या संशोधकाच्या मते दातांची चमक आरशातही स्पष्ट दिसावी यासाठी दात काळे केले जात असावे. दात काळे करण्याचा उगम कुठून झाला याची चर्चा करताना व्हिएतनामच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये ‘काळ्या दातांचे साम्राज्य’ असा एक भाग होता असेही दिसले.
यासाठी डाळींबाची साल आणि काही लोह क्षार एकत्र करून भुकटी तयार केली जात असावी. काही वनस्पतीमध्ये आढळणारा तुरटपणा तोंडात एक चेतना निर्माण करतो. त्यामधूनही तोंडाचे रोग कमी करू शकणारी पद्धत सुरु झाली असेल असे मानायलाही जागा आहे…
श्याम तारे
प्रसन्न फीचर्स
