पाकिस्तानवरील ताजे शुक्लकाष्ट
बंडखोरांनी बलुचिस्तान प्रांताला हादरवून टाकले आहे. तथापि, यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने प्रतिहल्ला सुरू केला. त्यात आतापर्यंत दोनशेजणांचा बळी गेला आहे. पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांनी भारताची केली, तशीच बलुचिस्तानचीही फसवणूक केली आहे. फसवणूक झालेली बलुचिस्तानमधील जनता पाकिस्तानला कायम शत्रू समजत असून, तिथे गेली आठ दशके संघर्षाची आग धुमसत आहे. बलुचिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर 40 तास चाललेल्या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दोनशे जणांना ठार मारले. यामध्ये 31 नागरिक, 17 सुरक्षा कर्मचारी आणि ‌‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए)‌’च्या 145 लढवय्यांचा समावेश आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी राजधानी क्वेटा येथे पत्रकार परिषदेत सांगितले, की दहशतवादाविरुद्धच्या युद्धात हा पाकिस्तानचा आतापर्यंतचा सर्वाधिक बळींचा आकडा आहे. बलुची लोक ‌‘बीएलए‌’ लढाऊंना रसद पुरवत आहेत. व्हायरल व्हिडीओने पाकिस्तान सरकारचे दावे उघड केले. यापूर्वी क्वेटा, ग्वादर, मुस्टुंग आणि नोशकी अशा अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी बलुच हल्ले झाले होते. ‌‘बलुच लिबरेशन आर्मी‌’ (बीएलए)ने हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे सैन्य, पोलिस आणि दहशतवादविरोधी युनिट्सनी मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने कोणताही पुरावा न देता लगेचच हे हल्ले भारतपुरस्कृत आहेत, असा आरोप केला होता. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या दाव्याचा पुनरुच्चार केला आणि म्हटले, की हल्लेखोरांचे भारताशी संबंध आहेत. भारताने पाकिस्तानचे निराधार आरोप फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, हे दावे केवळ पाकिस्तानच्या अंतर्गत अपयशांवरून लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात आले असून पाकिस्तानची ही जुनी युक्ती आहे. प्रत्येक हिंसक घटनेनंतर निराधार आरोप करण्याऐवजी, पाकिस्तानने या प्रदेशातील आपल्या लोकांच्या दीर्घकालीन मागण्यांकडे लक्ष केंद्रित करावे. एकंदरीत, मात्र या सर्व घडामोडींनंतरही बलूचिस्तानमधील अस्वस्थता कमी झालेली नाही.
दडपशाही, क्रूरता आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याची पाकिस्तानची परंपरा सर्वज्ञात आहे. ‌‘बीएलए‌’ने म्हटले आहे, की सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून ‌‘ऑपरेशन हारोफ‌’चा दुसरा टप्पा सुरू केला गेला आहे. लष्कराने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 41 बंडखोरांना ठार मारल्याचा दावा केल्यानंतर एका दिवसात ही घोषणा करण्यात आली. त्यांच्या सैनिकांनी नोश्की येथील ‌‘काउंटर टेररिझम डिपार्टमेंट‌’ (सीटीडी) मुख्यालय ताब्यात घेतले आणि ‌‘फ्रंटियर कॉर्प्स युनिट‌’ उद्ध्वस्त केले. त्यात अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. इतरत्र बंडखोरांनी जिल्हा तुरुंगातून किमान तीस कैद्यांना मुक्त करुन शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. सुरक्षा दलांनी जवळजवळ एक डझन ठिकाणे सील केली. 24 तासांहून अधिक काळ संपूर्ण प्रांतात मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आणि रेल्वे सेवा निलंबित करण्यात आली. सामान्यतः गजबजलेले क्वेटा शहर स्फोटांनंतर जवळजवळ निर्जन बनले. मुख्य रस्ते आणि बाजारपेठा बंद होत्या आणि लोक भीतीच्या वातावरणात घरातच होते.
1947 मध्ये मोहम्मद अली जिना यांनी मीर अहमद खान यांच्यासह बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून स्थापित करण्यासाठी प्रयत्नांचे नेतृत्व केले. 12 ऑगस्ट 1947 रोजी बलुचिस्तानला स्वतंत्र म्हणून घोषित केले; परंतु सुरक्षा पाकिस्तानकडे सोपवण्यात आली. मार्च 1948 मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानला आपल्यात विलीन केले. त्यामुळे तेथील लोक संतप्त झाले. भारताचे दोन भागात विभाजन करण्यासाठी जिनांनी आपले जीवन समर्पित केले. एके काळी महात्मा गांधी यांचे अनुयायी असलेले जिना 1906 ते 1920 पर्यंत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे समर्थक होते. 1920 मध्ये काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनानंतर ते काँग्रेसपासून वेगळे झाले आणि मुस्लिम लीगशी पूर्णपणे जुळवून घेतले. येथेच जिना भारताचे दोन भागात विभाजन करण्याच्या वेडेपणात अडकले. बलुचिस्तानदेखील याला बळी पडला. दुसऱ्या महायुद्धानंतर, ब्रिटिश आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले. आपण आता भारतावर राज्य करू शकत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले. संपूर्ण भारतात स्वातंत्र्यासाठी बंड सुरू झाले. त्यानंतर ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. जिना मुस्लिमांसाठी वेगळ्या देशाच्या मागणीवर ठाम होते. त्याच वेळी कलात प्रांतामध्ये, नंतर बलुचिस्तानमध्येही वेगळ्या देशाच्या स्वातंत्र्याची मागणी तीव्र झाली. 1946 मध्ये ब्रिटिशांनी भारत सोडत असल्याचा निर्णय घेतला तेव्हा कलातचे खान मीर अहमद खान यांनी जिना यांना ब्रिटिशांसमोर आपला खटला सादर करण्यासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्त केले. त्यांना विश्वास होता, की मुस्लिम मातृभूमीची मागणी करणारे जिना ब्रिटिशांसमोर त्यांची मागणी चांगल्या प्रकारे मांडू शकतील.
4 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीमध्ये बलुचिस्तान नावाचा नवीन देश स्थापन करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली. मीर अहमद खान यांच्यासह जिना आणि जवाहरलाल नेहरूदेखील या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत जिना यांनी कलातच्या स्वातंत्र्याची बाजू मांडली. ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनीही कलातला भारत किंवा पाकिस्तानचा भाग बनण्याची आवश्यकता नाही, हे मान्य केले. स्वतंत्र बलुचिस्तान तयार करण्यासाठी कलात, खारान, लास बेला आणि मकरन हे चार जिल्हे विलीन करण्याचा सल्ला जिना यांनी दिला होता. 11 ऑगस्ट 1947 रोजी कलातचे प्रतिनिधी आणि मुस्लिम लीग यांच्यात बलुचिस्तान हा स्वतंत्र देश म्हणून स्थापित करण्याचा करार झाला. तथापि, बलुचिस्तानची सुरक्षा पाकिस्तानकडे सोपवण्यात आली. शेवटी, 12 ऑगस्ट रोजी कलातच्या खानने बलुचिस्तानला स्वतंत्र देश घोषित केले. बलुचिस्तानमधील एका मशिदीतून कलातचा पारंपारिक ध्वज फडकवण्यात आला; परंतु स्वातंत्र्य घोषित झाल्याच्या एक महिन्यानंतर 12 सप्टेंबर रोजी ब्रिटनने बलुचिस्तान वेगळा देश बनण्याच्या स्थितीत नाही आणि आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या स्वीकारू शकत नाही, असा ठराव मंजूर केला. 2000 पर्यंत, पाकिस्तानविरुद्ध बलुचिस्तानने चार वेळा बंड केले. आजही तेच होत आहे, परंतु या वेळी बलुचिस्तानच्या लढाईला मोठी धार आली आहे. त्याचाच प्रत्यय सध्या येत आहे.
(अद्वैत फीचर्स)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *