नैसर्गिक वारशाचे संरक्षण आवश्यक

पृथ्वीवरील जीवन आपल्या कल्पनेपेक्षा खूपच गुंतागुंतीचे आणि गूढ आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी महान स्वीडिश निसर्गशास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांनी प्रत्येक सजीव वस्तू ओळखण्याचा आणि त्यांना नावे देण्याचा धाडसी प्रयत्न केला. त्यांना आधुनिक वर्गीकरणाचे जनक मानले जाते. आज शास्त्रज्ञ त्याच शोधाला गती देत आहेत. दर वर्षी सरासरी 16 हजारांहून अधिक नवीन प्रजाती शोधल्या जात आहेत. त्यांचे जतन करणे आवश्यक आहे.

पृथ्वीवरील जीवनाची विविधता आपल्या कल्पनेपेक्षा किती तरी पटींनी अधिक आहे. शास्त्रज्ञ दर वर्षी प्राणी आणि वनस्पतींच्या 16 हजारांहून अधिक नवीन प्रजाती शोधत आहेत. त्यामुळे जीवनाची अनेक अनाकलनीय रहस्ये उलगडत आहेत. हे शोध ज्ञानात वाढ करतातच, पण संवर्धन आणि विविध व्याधींवरील औषधांसाठीदेखील ते तेवढेच महत्त्वाचे आहेत. प्रगत डीएनए तंत्रज्ञानामुळे अशाच काही लपलेल्या प्रजाती भविष्यात उघडकीस येऊ शकतात. निष्कर्षांवरून असे दिसून येते, की 2015 ते 2020 या कालावधीमध्ये दर वर्षी सरासरी 16 हजारांहून अधिक नवीन प्रजातींची नोंद झाली. यामध्ये दहा हजारांहून अधिक प्राणी (बहुतेक कीटक आणि इतर आर्थ्रोपॉड्स), 2,500 वनस्पती आणि 2000 प्रकारच्या बुरशी यांचा समावेश आहे.
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार भविष्यात माशांच्या एक लाख 15 हजार प्रजाती आणि उभयचरांच्या 41 हजार प्रजाती उदयास येऊ शकतात. आजपर्यंत फक्त 42 हजार माशांच्या आणि नऊ हजार उभयचरांच्या प्रजातींचा शोध लागला आहे. समुद्रात एकां ठरावीक खोलीपर्यंत मानव पोहोचला आहे. परंतु अजूनही मानवाला समुद्रातील सर्व सजीव आणि रहस्यांची संपूर्ण माहिती झालेली नाही. त्यामुळे ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार वनस्पती प्रजातींची एकूण संख्या पाच लाखांपेक्षा जास्त असू शकते. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, की नवीन प्रजातींच्या शोधाचा वेग वाढतच जाईल. उदाहरणार्थ, शास्त्रज्ञांनी आजवर अंदाजे 1.1 दशलक्ष कीटक प्रजाती ओळखल्या आहेत तर अनेक शास्त्रज्ञांच्या मते ही संख्या सहा दशलक्षाच्या जवळ असू शकते. वनस्पती, बुरशी, कोळी, मासे आणि उभयचरांसह अनेक गटांमधील जैवविविधता आपल्या कल्पनेपेक्षा खूपच समृद्ध आहे. या अभ्यासाचे निकाल ‌‘सायन्स ॲडव्हान्सेस‌’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
मानवी हस्तक्षेपामुळे स्थानिक वनस्पतीविविधता कमी होत आहे. निसर्ग आपल्या कल्पनेपेक्षा अधिक रंजक आहे. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता, की नवीन प्रजातींचा शोध मंदावला आहे आणि आता शोधण्यासाठी कदाचित फारसे काही शिल्लक राहिले नाही; परंतु त्यांनी हाती घेतलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष याउलट माहिती देतात. आज आपण पूर्वीपेक्षा अधिक वेगाने नवीन प्रजाती शोधत आहोत आणि जीवनाच्या विविधतेची रहस्ये उलगडत आहोत. दररोज हजारो नवीन प्रजाती शोधल्या जातात. शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात जवळजवळ 20 लाख ज्ञात प्रजातींचे विश्लेषण करण्यात आले. नवीन प्रजाती शोधण्याचा दर नामशेष होण्याच्या दरापेक्षा खूपच जास्त आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार, दर वर्षी सुमारे दहा प्रजाती नामशेष होत आहेत तर हजारो नवीन प्रजाती उदयास येत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, या हजारो नवीन प्रजाती केवळ सूक्ष्मजीव नाहीत, तर त्यात कीटक, वनस्पती, बुरशी आणि शेकडो नवीन पृष्ठवंशी प्राणी यांचादेखील समावेश आहे.
सुमारे दोन तृतीयांश वनस्पती आणि प्राणी अनुवांशिक विविधता गमावत आहेत, हा जगण्यासाठी धोक्याचा संकेत आहे का? संशोधकांना असे आढळून आले आहे, की शास्त्रज्ञ दर वर्षी पूर्वीपेक्षा जास्त प्रजातींचे वर्णन करत आहेत. भविष्यात किती प्रजाती शोधल्या जातील, याचा अंदाज लावण्यासाठी त्यांनी कालांतराने नवीन प्रजाती किती वेगाने उदयास येत आहेत, याचा अभ्यास केला. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार भविष्यात माशांच्या एक लाख 15 हजार तर उभयचरांच्या 41 हजार प्रजाती शोधल्या जाऊ शकतात. यापूर्वीच म्हटल्यानुसार आतापर्यंत माशांच्या केवळ 42 हजार आणि उभयचरांच्या नऊ हजार प्रजाती सापडल्या आहेत. यावरून आणखी किती प्रजातींचा शोध लागू शकेल, याचा अंदाज येऊ शकेल. शास्त्रज्ञांचा असाही अंदाज आहे, की वनस्पतींच्या प्रजातींची एकूण संख्या पाच लाखांपेक्षा जास्त असू शकते. सध्या आपल्याला सुमारे 2.5 दशलक्ष प्रजाती माहीत आहेत, परंतु प्रत्यक्ष संख्या अब्जावधींमध्येही असू शकते.
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार यापुढे नवीन प्रजातींच्या शोधाचा वेग वाढतच जाईल. कीटक प्रजातींची एकूण संख्या सुमारे 20 दशलक्ष असू शकते. हवामानबदलाच्या विळख्यात जैवविविधता, आठ हजार प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे. सध्या बहुतेक नवीन प्रजाती त्यांच्या बाह्य स्वरूपावरून ओळखल्या जातात, परंतु डीएनए आणि आण्विक तंत्रज्ञानात प्रगती होत असताना गुप्त प्रजातीदेखील उघड होतील. अनेक जीव सारखे दिसतात, परंतु अनुवांशिकदृष्ट्या वेगळे असतात. यामुळे विशेषतः जीवाणू आणि बुरशीच्या जगात मोठे शोध लागतील अशी अपेक्षा आहे. नवीन प्रजातींचा शोध लागल्याने केवळ मानवाच्या ज्ञानात भर पडेल, असे नाही, तर मानवाला अनेक फायदेही होऊ शकतात. एखादी प्रजाती वाचवण्यासाठी सर्वप्रथम तिचे वैज्ञानिकदृष्ट्या दस्तावेज तयार करायला हवेत. शिवाय, अनेक नवीन प्रजाती औषध आणि तंत्रज्ञानासाठी खजिना ठरू शकतात.
वजन कमी करण्याच्या औषधांमध्ये वापरले जाणारे जीएलपी-1 हे संप्रेरक (हार्मोन) गिला मॉन्स्टर नावाच्या सरड्यापासून प्रेरित होते. त्याचप्रमाणे कोळी आणि सापांचे विष तसेच अनेक वनस्पती आणि बुरशी, वेदना, कर्करोग आणि इतर रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ब्रिटिश संशोधकांच्या अभ्यासानुसार 170 वर्षांमध्ये 80 टक्के निलगिरी गवताळ प्रदेश नष्ट झाले; परंतु काही प्राण्यांच्या विशेष क्षमता मानवी तंत्रज्ञानालादेखील प्रेरणा देतात, उदाहरणार्थ, सरडा वंशीय ‌‘गेको‌’ या प्राण्याच्या ‌‘सुपर-ॲधेसिव्ह‌’ पायांचा अभ्यास करून त्यानुसार भिंतीवर चढण्याचे नवीन साहित्य विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशोधक आता कोणत्या भागात नवीन प्रजाती शोधण्याची शक्यता अधिक आहे, हे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना न सापडलेल्या जैवविविधतेचे ‌‘हॉटस्पॉट्स‌’ ओळखता येतील, अशी आशा आहे. ते संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांची पार्श्वभूमी कशी बदलत आहे आणि स्थानिक शास्त्रज्ञ आता त्यांच्या स्वतःच्या देशांमधून अधिक प्रजाती शोधत आहेत का, हे देखील पाहत आहेत.
लिनियसच्या शोधाच्या प्रवासाला सुरुवात होऊन तीनशे वर्षे झाली आहेत; परंतु गेल्या दोन दशकांमध्ये सर्व ज्ञात प्रजातींपैकी 15 टक्के प्रजाती सापडल्या आहेत. प्रत्येक नवीन शोध आपल्याला पृथ्वीवरील आश्चर्यकारक जैवविविधतेला समजून घेण्याच्या आणि त्यांचे संरक्षण करण्याच्या जवळ घेऊन जातो. पृथ्वीवरील जीवनाची कहाणी अजूनही अपूर्ण आहे. नवीन प्रजाती शोधणे, हा केवळ भूतकाळातील वारसा नाही, तर भविष्यासाठी एक गरज आहे. कारण ज्ञात आहे तेच जतन केले जाऊ शकते. या नवीन शोधांमुळे भारतात आतापर्यंत एकूण 56 हजार 177 वनस्पती प्रजातींची नोंद झाली आहे. त्यात फुलांच्या वनस्पती (अँजिओस्पर्म्स), जिम्नोस्पर्म्स, फर्न (टेरिडोफाइट्स), मॉसेस (ब्रायओफाइट्स), लायकेन, बुरशी आणि शैवाल यांचा समावेश आहे. वर्षानुवर्षे करण्यात आलेले हे संशोधन भारताच्या विपुल जैवविविधतेचे स्पष्टपणे प्रदर्शन करते. ते भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (झेडएसआय) आणि भारतीय वनस्पती सर्वेक्षण (बीएसआय) यासारख्या संस्थांनी केलेल्या महत्त्वपूर्ण आणि प्रभावी वैज्ञानिक संशोधन आणि सर्वेक्षणांचे महत्त्वदेखील अधोरेखित करतात. या नवीन प्रजातींची ओळख, आपण आपल्या नाजूक परिसंस्थांचे संरक्षण करण्यावर गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, हे शिकवते. नवीन प्रजाती केवळ आपले जैविक ज्ञान समृद्ध करत नाहीत, तर पर्यावरणीय संशोधन, औषधी शक्यता आणि संवर्धन धोरणांसाठी नवीन दारेदेखील उघडतात. भारताची ही जैवविविधता आपल्याला नैसर्गिक वारशाचे संरक्षण करणे, हे केवळ एक कर्तव्य नसून सामूहिक जबाबदारी आहे, याची आठवण करून देते.

पर्यावरण

मिलद बेंडाळे

(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *