ई रिक्षांच्या बेमुदत बंदमुळे शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

मुकुंद रांजाणे

माथेरान : श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे आणि त्यांना महत्वाची साथ ही ई रिक्षा समर्थकांनी दिलेल्या आर्थिक योगदानामुळे खऱ्या अर्थाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ई रिक्षाच्या सेवेमुळे इथे पर्यटन मोठया प्रमाणावर वाढले असून सर्वांनाच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.समस्त ग्रामस्थांनी या सुविधेचा लाभ घेत स्वागत केले आहे. परंतु फक्त वीस ई रिक्षा कार्यरत असून एकूण ९४ परवानाधारक असताना अजून वीस ई रिक्षा देण्यात येणार आहेत.त्यामुळे अजूनही ५४ परवानाधारक हे वंचित राहू नये यासाठी दि.२३ फेब्रुवारी पासून ई रिक्षा बेमुदत बंद करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम शालेय विद्यार्थी, दिव्यांग, रुग्ण, येणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागत आहे.या बंदच्या काळात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी असोत किंवा दिव्यांग,आबालवृद्ध पर्यटक यांना ही रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे परंतु धडधाकट शासकीय अधिकारी वर्ग जो ई रिक्षाचा मोफत वापर करत असतात ते बिनधास्तपणे रुग्णवाहिकेत बसून जाताना दिसत आहेत. एकीकडे रुग्णवाहिकेचा गैरवापर होऊ नये असे सांगण्यात येते आणि दुसरीकडे शासकीय अधिकारी आरामात मोफत ह्या सुविधेचा उपभोग घेत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबतीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.शासकीय अधिकारी जर का बॉस झाले तर माथेरानचे काय होणार ? अधिकारी वर्गावर अंकुश ठेवण्यासाठी गावात कुणी सक्षम लोकप्रतिनिधी नाहीत का ? असाही प्रश्न स्थानिकांना सतावत आहे.

सलग दुसऱ्या दिवशी सुध्दा ई रिक्षा बंद असल्याने याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. ही सुविधा बंद असल्यामुळे बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. ई रिक्षाच्या संख्येत वाढ करावी असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असताना देखील अकार्यक्षम सनियंत्रण समिती जाणूनबुजून या श्रमिकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ह्या समितीला बरखास्त करून टाका अन्यथा ई रिक्षाच्या वाढीसाठी आम्हाला आमरण उपोषण करावे लागेल असे महिला वर्गाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *