भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची राहुल काटकर यांची मागणी
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव अत्यंत चिंताजनक बनला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची मागणी कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी कल्याण (पूर्व) येथे राहणारे आयेश अमीन या युवकाला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर रेबिजची भीती मनात निर्माण झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महानगरपालिका रुग्णालयांमध्ये रेबीज लसीचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित विभागाच्या नियोजनातील त्रुटी व निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येतो. कुत्रा चावल्यानंतर तात्काळ व पूर्ण लसीकरण होणे आवश्यक असताना लसीची अनुपलब्धता नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी आहे.
तरी परिसरात तातडीने कुत्रे पकड मोहीम राबवावी. सर्व भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी मोहिम युद्धपातळीवर राबवावी. महानगरपालिका रुग्णालयांत रेबीज लस कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावी. संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी. नागरिकांसाठी जनजागृती मोहीम व आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी राहुल काटकर यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.
