बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवा
भाजपा नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची केडीएमसी महापौरांकडे मागणी
कल्याण : बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केली असून याबाबत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे १२२ नगरसेवक दिनांक १६ जानेवारी रोजी निवडून आले असून, ३ फेब्रुवारी रोजी महापौरपदी नियुक्ती हर्षाली चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. तथापि, बीपीएमसी कायद्या  मधील तरतुदीनुसार  महानगरपालिकेचे कर व दर हे दिनांक २० फेब्रुवारीपूर्वी निश्चित करणे अत्यावश्यक आहे. मात्र, आजपर्यंत यासंदर्भात कोणतीही महासभा घेण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
गेल्या पाच वर्षांपासून महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून चालू होता. नागरिकांनी व लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून दिलेल्या १२२ नगरसेवकांच्या अस्तित्वातही जर अशा महत्त्वाच्या विषयांवर महासभा होत नसेल, तर पुन्हा प्रशासनाचा कारभार प्रशासकांच्या हातीच राहणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नगरसेवकांच्या मनात निर्माण होत आहे. महासभा ही लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च निर्णयप्रक्रिया असून, तिच्यामार्फतच कर व दर निधित होणे अपेक्षित आहे. यामध्ये विलंब होणे हे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनेही योग्य नाही.
त्यामुळे तातडीने महासभा बोलवून कर व दर निश्चित करण्याचा विषय मांडण्यात यावा. महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या अधिकारानुसार निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी महापौरांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *