सावरकर स्मृतिदिनी घुसखोरांविरोधात देशव्यापी मोहिमेची मागणी
मुंबई – पाटील मारुती मंदिर सभागृह, दादर (पश्चिम) येथे हिंदू महासभा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ६० व्या स्मृतिदिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. ‘रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी घुसखोर मतदारांची राष्ट्रीय समस्या’ या विषयावर या चर्चासत्रात विविध वक्त्यांनी आपली मते मांडली.
या वेळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. कुलकर्णी यांनी १९८० साली म्यानमार सरकारने नागरी कायदा केल्यानंतर रोहिंग्या मुस्लिमांवर कारवाई सुरू झाल्याचा संदर्भ देत, जगातील विविध देशांत सुमारे ७ लाख रोहिंग्या मुस्लिम विस्थापित अवस्थेत राहत असल्याचा दावा केला. भारतात जम्मू, हैदराबाद, आसाम, सिक्कीम, दिल्ली आणि मुंबई येथे मोठ्या संख्येने रोहिंग्या मुस्लिम वास्तव्यास असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काहींचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भारत-बांगलादेश सीमेबाबत बोलताना त्यांनी सुमारे ४ हजार किमी लांबीची सीमा जंगल आणि नद्यांनी वेढलेली असल्याने घुसखोरी सहज होत असल्याचा मुद्दा मांडला. देशात सुमारे २ लाख बांगलादेशी मुस्लिम वास्तव्यास असून त्यांची ओळख पटवून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे सरकार सत्तेत असूनही घुसखोरांविरोधात ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली. घुसखोरांमुळे रोजगार, पाणी, रस्ते, वैद्यकीय सेवा आदी नागरी सुविधांवर ताण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकसंख्येतील बदलांचा संदर्भ देताना त्यांनी एका सर्वेक्षणाचा हवाला देत हिंदूंचे प्रमाण ८८ टक्क्यांवरून ६६ टक्क्यांवर आले असून मुस्लिमांचे प्रमाण ८ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा केला. अल्पसंख्याकांचे प्रमाण वाढत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. हिंदू महासभेचे मुंबई अध्यक्ष अनूप केणी यांनी भाजप सत्तेत आल्यानंतरही हिंदूंकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. बंगाल आणि केरळमधील परिस्थितीबाबत त्यांनी सरकारवर टीका केली. देशाच्या लोकसंख्येतील बदलांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
समारंभाचे अध्यक्ष तथा हिंदू महासभा परळचे अध्यक्ष दिनेश भोगले यांनी फेरीवाल्यांवरील कारवाई हा प्रश्नाचे संपूर्ण उत्तर नसल्याचे सांगत, घुसखोरांविरोधात देशव्यापी मोहीम राबवावी, अशी मागणी केली. यावेळी दत्ताजी सणस, महेश सावंत पटेल, हरीश शेलार आदी मान्यवरांनीही आपली मते व्यक्त केली.
