स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची आमदार प्रसाद लाड यांची मागणी
मुंबई, फेब्रुवारी : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अद्वितीय क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त, द्रष्टे विचारवंत आणि प्रभावी साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण जीवन राष्ट्रार्पणाचे तेजस्वी उदाहरण असल्याचे नमूद करत आमदार लाड यांनी म्हटले आहे की, अल्पवयातच सावरकरांनी परकीय सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. ‘अभिनव भारत’ या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला वैचारिक व संघटनात्मक बळ दिले. “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” या त्यांच्या ग्रंथाने ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले आणि स्वातंत्र्याच्या विचारांना नवे अधिष्ठान दिले.
अंदमानच्या सेल्युलर तुरुंगातील काळ्या पाण्याची अमानुष शिक्षा भोगूनही त्यांच्या राष्ट्रनिष्ठेत किंचितही फरक पडला नाही. कारागृहात असतानाही त्यांनी साहित्यनिर्मिती सुरू ठेवत सहकाऱ्यांमध्ये राष्ट्रभावना जागृत ठेवली. सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर प्रखर समाजसुधारकही होते. अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक समरसता, स्त्रीशिक्षण आणि एकात्मतेसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पतितपावन मंदिराच्या स्थापनेद्वारे त्यांनी समाजातील सर्व घटकांना समान हक्काचा संदेश दिला.
अशा बहुआयामी आणि राष्ट्रनायक व्यक्तिमत्त्वाला आजपर्यंत ‘भारतरत्न’ सन्मान न मिळाल्याची खंत व्यक्त करत, त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी मरणोत्तर भारतरत्न प्रदान करणे हे राष्ट्राच्या त्यांच्याप्रती असलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक ठरेल, असा विश्वास आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे ठराव संमत करून शिफारस करण्यात यावी, अशी नम्र विनंतीही त्यांनी सभापतींकडे केली आहे.
याबाबत संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहात निवेदन सादर केले. लवकरच हा प्रस्ताव सभागृह आणि सभापतींकडे सादर करून, पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात येईल असे निवदेनात सांगितले.
