येऊर : ठाणे परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या जैवविविधतेने समृद्ध उद्यान परिसरात वाढती वाहन रहदारी, पर्यटकांची गर्दी आणि विविध कार्यक्रमांमधून होणाऱ्या कर्कश ध्वनीप्रदूषणामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
उद्यान परिसर हा बिबटे, हरणे, विविध प्रजातींचे पक्षी तसेच इतर वन्यजीवांचे नैसर्गिक निवासस्थान आहे. मात्र अलीकडच्या काळात वाहनांचे वाढते प्रमाण, अनियंत्रित हॉर्नचा वापर आणि मोठ्या आवाजातील कार्यक्रमांमुळे जंगलातील शांतता भंग होत आहे. परिणामी, वन्यजीवांच्या हालचाली, प्रजनन चक्र आणि अन्नसाखळीवर विपरीत परिणाम होत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर पर्यावरण अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत रविंद्र सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भावनिक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी उद्यान परिसर ‘सायलेंट झोन’ घोषित करण्याची, ध्वनीप्रदूषणावर कठोर मर्यादा घालण्याची, ‘हॉर्न-फ्री झोन’ लागू करण्याची तसेच वाहन वर्दळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
“जंगलात प्राण्यांचा आवाज असावा, माणसांचा नाही,” असे सांगत डॉ. सिनकर यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून जैवविविधतेचे संरक्षण करावे, असे आवाहन केले आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा देत जंगलातील शांतता आणि नैसर्गिक समतोल जपण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली आहे.
