कल्याण धावणार डबल डेकर कॉरिडॉरवर
खाली रस्ता, मध्ये फ्लायओव्हर आणि वर मेट्रो
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व मेट्रो मार्गिका ‘डबल डेकर’ पद्धतीने उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजेच खाली मुख्य रस्ता, त्यावर फ्लायओव्हर आणि सर्वात वर मेट्रो मार्गिका, अशी त्रिस्तरीय रचना या प्रकल्पांची असणार आहे. यामध्ये कल्याण-तळोजा मेट्रो १२, कांजूरमार्ग–बदलापूर मेट्रो १४, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ तसेच दुर्गाडी मार्गे कल्याण–उल्हासनगर–अंबरनाथ–चिखलोलीपर्यंत जाणारी ५ अ मार्गिका, शिळफाटा–रांजनोली उन्नतमार्ग आणि वालधुनी–नेवाळी उन्नतमार्ग या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व कामांची अंमलबजावणी मुंबई मेट्रोपोलिटियान रीजन डेवलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) मार्फत सुरू आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबई येथे या प्रकल्पांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत विविध विस्तारित मार्गिकांचे प्रस्ताव मांडण्यात आले. एमएमआरडीएने या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सविस्तर आराखडा तयार करण्याचे संकेत दिले आहेत.
मेट्रो ५ चे विस्तारीकरण
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ च्या विस्तारित ५ अ मार्गिकेला दुर्गाडी नाका ते उल्हासनगरमार्गे अंबरनाथच्या मध्यवर्ती भागात उभारल्या जाणाऱ्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. तसेच ५ ब (चिखलोली ते बदलापूर) आणि ५ क (दुर्गाडी ते टिटवाळा) अशा नव्या मार्गिकांसाठीही आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या मार्गिका पूर्ण झाल्यास अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील नागरिकांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.
मेट्रो १२ आणि १२ ब
मेट्रो १२ चे काम सध्या वेगाने सुरू असून पिलर आणि स्थानक उभारणीची कामे प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पाला अधिक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मेट्रो १२ चे १२ ब हे विस्तारीकरण शिळफाटा–मुंब्रा–कळवा मार्गे ठाण्यापर्यंत नेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
इतर महत्त्वाचे प्रकल्प
शिळफाटा–रांजनोली येथे द्विस्तरीय (डबल डेकर) रस्ता उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कल्याण (पूर्व) येथील यु-टाईप आणि श्रीमलंग रस्त्यांचे काम गतीमान करण्याबाबत निर्देश देण्यात आले. बाधित नागरिकांना तात्पुरते पुनर्वसन बीएसयुपी घरांमध्ये करून, पुढे क्लस्टर योजनेअंतर्गत त्यांना कायमस्वरूपी घरे देण्याचा प्रस्तावही चर्चिला गेला.
ऐरोली–काटई फ्रीवेवरील काटई नाका बोगद्याचे काम तसेच टप्पा ३ साठीची भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या सर्व प्रकल्पांमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम मिळणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.
