निसर्गातील पंचतत्त्वांचे जतन करून घरोघरी नर्सरी ही संकल्पना राबवावी – महापौर डिंपल मेहता
मिरा – भाईंदर : पर्यावरण संवर्धन ही केवळ शासन किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. निसर्गातील पंचतत्त्वांचे जतन करून घरोघरी नर्सरी ही संकल्पना राबवावी, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांनी केले. महापालिका आयोजित वसुंधरा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित या तीन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी महापौरांच्या हस्ते आणि आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
माझी वसुंधरा महोत्सवाच्या निमित्ताने पद्मभूषण मेजर ध्यानचंद मैदानात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी प्रदर्शनातील पर्यावरणपूरक स्टॉल्स आणि शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. या प्रदर्शनात औषधी वनस्पती, बी-बियाणे आणि विविध नर्सरी, आयुर्वेदिक उत्पादने, हस्तकला आणि हँडलूम वस्त्रे, सोलर सेल्स, सोलर बॅटरी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारखी आधुनिक तंत्रज्ञानाची सादरीकरणे करण्यात आली. या सोहळ्याला उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत, महिला व बालकल्याण समिती सभापती अनिता पाटील, उपसभापती हेमा बेलानी, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व प्रियंका राजपूत, डॉ. सचिन बांगर, कविता बोरकर, प्रणाली घोंगे, स्वप्नील सावंत, नागेश विरकर हेही उपस्थित होते.
