टँकरच्या नावाने करोडो रुपयांची झाली सरकारी उधळपट्टी तरीही पाणी टंचाई कायम !
धरणांच्या तालुक्याची भयानक कैफियत
अविनाश उबाळे
ठाणे : शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी गाव पाड्यांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या काळात उन्हाळ्यात दरवर्षी टंचाईग्रस्त गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरविले जाते.यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून सरकारी टँकर सुरु केले जातात केवळ आदिवासी गाव पाड्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आजमितीस सरकारी तिजोरीतून करोडो रुपयांची टँकरच्या नावाने उधळपट्टी केलेली आहे.उन्हाळा सुरु झाला की टंचाई गाव पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा पाणी पुरवठा विभागाकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जातो त्यास शासनाची मंजूर मिळाली की टँकर सुरु करण्यासाठी निविदा मागविल्या जातात आपल्या मर्जीतल्याच टँकर लॉबीला पाणी पुरविण्याची दरवर्षी कंत्राट दिली जातात जिथे टँकर पोहचू शकत नाहीत अशा डोंगरदऱ्या खोऱ्यात पठारावर असलेल्या वाड्या वस्त्यांवर बैलगाडीतून पाणी पुरवठा केला जातो गेल्या १० वर्षांत तब्बल ६ कोटींहून अधिक खर्च हा राज्य सरकारला केवळ टंचाई गाव पााड्यांना पाणी पुरविण्यासाठी करावा लागला आहे बरेच वर्ष टँकरवर अवलंबून असणारा शहापूर तालुका दुर्दैवाने आजही टँकरमुुक्त होऊ शकलेला नाही .
आजही आदिवासी महिलांची पाण्यासाठी सुरु असलेली वणवण व त्यांच्या डोक्यावर हंडा हे चित्र नजरेस पडते.टँकर उन्हाळ्यात सुरु होऊनही हे टँकर कधीच सुरळीतपणे व वेळेवर टंचाई ग्रस्त गाव पाड्यांवर पोहचले नाहीत अशी ओरड आदिवासी महिलांची असते आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती देखील तशीच बघायला मिळते आहे.अनियमित टँकर येत असल्याने टँकरची वाट पाहत बसण्यापेक्षा आदिवासी पाण्यासाठी इतरत्र भटकंती करतात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका आदिवासींना बसत असल्याने टँकर नंतरही पाण्यासाठी त्यांचे भयानक हाल सुरुच असल्याचे चित्र तालुक्यातील टंचाई ग्रस्त गाव पाड्यांवर दिसत आहे .टंचाई ग्रस्त भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याबरोबरच टंचाई आराखड्यात नवीन पाणी योजना प्रस्तावित करणे,नव्या विहीरी बांधणे,विहिरींमधील गाळ काढणे,व विहिरींचे खोलीकरण करणे ,नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करणे, नवीन विंधन विहीरी,जुन्या विंधन विहीरींची दुरुस्ती करणे,हात पंप बसवणे टंचाईग्रस्त भागातील गावासाठी बोअरवेल मंजूर करणे यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो पण गेल्या कित्येक वर्षापासून हा निधी खर्च होऊनही अनेक योजनांत गैरव्यवहार झाल्याने बहुतांश योजनांचा खर्च हा अक्षरशः पाण्यात गेलेला दिसतो आहे .या गैरव्यवहार प्रकरणी स्थानिक ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांवर यापूर्वी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत या सर्व पाणी योजनांची शासनस्थरावर चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे .या सर्व पाणी योजना या कुचकामी ठरल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येथे आली आहे.जवळपास तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या गाव पाड्यावरील अनेक पाणी योजना बोगस ठरलेल्या आहेत.शहापूर तालुक्यात एकूण २०३ पाणी योजना असल्याची माहिती मिळते आहे यातील १३७ पाणी योजना या कशातरी रडतखडत सुरु आहेत तर जवळपास १७ पाणी योजना अपूर्ण अवस्थेत बंद पडून आहेत.बऱ्याच आदिवासी वस्त्यांमध्ये पाणी योजनाच नाहीत ठाणे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कित्येक वर्ष टँकरने पाणी पुरविण्याचे नियोजन करते परंतु शहापूरची ही पाणी टंचाईची अवस्था पाहता व त्यासाठीचा होणारा अवास्तव खर्च पाहता टंचाईग्रस्तांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठीच्या ठोस अशा कोणत्याच उपाययोजना पाणी पुरवठा खात्याला एवढया वर्षांत करता आलेल्या नाहीत हे टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठयासाठी झालेल्या सरकारी खर्चावरुन स्पष्ट होत आहे.या कामी
ग्रामीण पाणी पुरवठा योजना सपशेल अपयशी ठरल्याने उन्हाळ्यात फक्त पाण्यासाठी टँकरवरच गाव पाड्यांवरील लोकांना अवलंबून राहावे लागत आहे.हे येथील जळजळीत वास्तव आहे.शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी सरकारचे कुठलेच योग्य नियोजन दिसून येत नसून केवळ नेहमीची येतो पावसाळा, या युक्ती प्रमाणे दरवर्षी फक्त टँकरने पाणी पुरवठा या गोंडस नावाखाली टँकर लॉबीला पोसण्याचे काम येथे कित्येक वर्ष प्रशासनाकडून सुरु असून ही टँकरच्या नावाने सरकारी उधळपट्टी येथे सुरु असल्याचे दिसत आहे .करोडो रुपये टँकरच्या नावाखाली खर्च होऊनही हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची उन्हातान्हात वणवण कायम असल्याचे विदारक असे चित्र धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यात दिसत आहे.
