रिक्षा चालकांचा उपोषणाचा इशारा
विविध मागण्यांसाठी घेतली उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱयांची भेट
कल्याण : रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी पूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयात शशांक राव व विलास भालेकर साहेब यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांना टॅक्सी संघर्ष कृती समिती कल्याण वतीने समितीचे अध्यक्ष महेंद्र मिश्रा, कृती समितीचे कार्याध्यक्ष विल्सन काळपुंड, कृती समितीचे उपाध्यक्ष मोहन पाठारे तसेच प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते
सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांना निवेदन देण्यात आले. तसेच लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
ऑटोरिक्षा चालक मालकांवर धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळच्या नोंदणी करण्यास सक्ती करण्यात येऊ नये व जे गैरकायदेशीररित्या सक्ती करत असतील अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळात रिक्षाचालक मालकांच्या नोंदणी करिता प्रवेश शुल्क व वार्षिक शुल्क रद्द करण्यात यावे व सर्व रिक्षाचालक मालकांची निःशुल्क नोंदणी या मंडळात करण्यात यावी.
ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र ने कल्याणकारी मंडळासाठी मागणी केलेल्या व सुचवलेल्या कल्याणकारी योजना रिक्षाचालक मालकांकरिता या मंडळामार्फत राबविण्यात याव्यात. महाराष्ट्र राज्य सरकारने ऑटोरिक्षांच्या परवाना वितरणावर स्थगिती आणली आहे. मात्र, इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्यावर स्थगिती आणलेली नाही. या सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही निषेध करत आहोत.
इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्या नोंदणीवर सरकारने तातडीने स्थगिती आणावी. अस्थित्वात असलेल्या इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्यावर ऑटोरिक्षा सारखेच नियम लावण्यात यावेत व त्यांना ठरवून दिलेल्या मार्गावरच वाहतूक करण्यासाठी कठोर कारवाही करण्यात यावी.
राज्य सरकार ने नुकतीच बाईक टॅक्सी वर बंदी घातली आहे, तरीही शहरात खाजगी कंपन्यांद्वारा अवैधरित्या बाईक टॅक्सी सेवा सर्रासपणे सुरु आहे. या अवैध बाईक टॅक्सी मुळे प्रवाश्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, या अवैध बाईक टॅक्सी व ती सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाही करत त्यांच्यावर बंदी आणण्यात यावी.
या सर्व मागण्या या अत्यंत रास्त मागण्या आहेत व ऑटोरिक्षा चालकांच्या भविष्यासाठी महत्वाच्या आहेत. तेव्हा यावर गांभीर्याने कारवाही कराल अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.
