निरोगी जीवनशैलीवर प्रकाशझोत
मानसिक आरोग्य ही केवळ वैयक्तिक समस्या नसून सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय विकासाशी थेट निगडित बाब आहे, हे या निष्कर्षांमधून अधोरेखित होते. अहवालातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे युवकांच्या मानसिक आरोग्याचा खालावत चाललेला स्तर. अनेक देशांमध्ये 18 ते 34 वयोगटातील व्यक्तींमध्ये चिंता, नैराश्य, असुरक्षितता आणि भावनिक अस्थिरता यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले दिसते. त्याच्या तुलनेत 55 वर्षांवरील व्यक्तींचे मानसिक आरोग्य तुलनेने स्थिर आहे. ही विसंगती अनेक प्रश्न उपस्थित करते. स्मार्टफोन, ‘सोशल मीडिया’ आणि सततचा ‘स्क्रीन-टाइम’ हे युवकांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे घटक ठरत आहेत. बालपणापासूनच स्क्रीनशी जोडले जाणे, प्रत्यक्ष खेळ आणि सामाजिक संवादाचा अभाव तसेच आभासी मान्यतेवर (लाइक्स, फॉलोअर्स) अवलंबून राहणे यामुळे आत्मसन्मान आणि भावनिक संतुलन ढासळते. डिजिटल माध्यमांनी माहितीचा महासागर उपलब्ध करून दिला; परंतु तुलना, असुरक्षितता आणि एकाकीपणाही वाढवला. आभासी जोड वाढली; पण प्रत्यक्ष नाती कमकुवत झाली. भावनांचे व्यवस्थापन, तणाव सहन करण्याची क्षमता आणि प्रतिकूल परिस्थितीत उभे राहण्याचे सामर्थ्य यांवर याचा विपरीत परिणाम होत आहे.
संयुक्त कुटुंबपद्धतीचे विघटन, एकल कुटुंबांची वाढ, पालकांची व्यस्तता आणि स्थलांतरित जीवनशैली यामुळे युवकांच्या भावनिक सुरक्षिततेचा पाया कमकुवत झाला आहे. कुटुंब आणि समुदाय हे मानसिक आरोग्याचे नैसर्गिक संरक्षण कवच असते. तेच ढासळले, तर युवक अधिक अस्थिर होणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न हा केवळ वैद्यकीय न राहता सामाजिक धोरणाचा विषय ठरतो. ग्लोबल माइंड हेल्थ इन 2025 हा अहवाल केवळ एक संशोधन दस्तावेज नाही, तर आधुनिक जगाच्या अस्वस्थतेचा आरसा आहे. आर्थिक वृद्धी, तांत्रिक प्रगती आणि शहरीकरणाच्या गतीमध्ये आपण मानवी मनाकडे दुर्लक्ष केले, तर विकासाची संकल्पना अपुरी ठरेल. एक सशक्त राष्ट्र उभे राहते, ते मानसिकदृष्ट्या सक्षम नागरिकांवर. युवकांची मनःस्थिती अस्थिर असेल, तर भविष्याचा पाया दुर्बल राहील. म्हणूनच मानसिक आरोग्य विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणे ही काळाची अपरिहार्यता आहे. जागतिक इशारे गांभीर्याने घेत, सजग आणि संवेदनशील समाज उभारणे हेच पुढील पाऊल असले पाहिजे. ‘ग्लोबल माइंड हेल्थ इन 2025’ या ताज्या अहवालाकडे भारताच्या संदर्भात केवळ आकडेवारीवर आधारित अभ्यास म्हणून पाहणे ही गंभीर चूक ठरेल. 84 देशांमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात भारतीय युवकांचा साठावा क्रमांक लागणे ही केवळ क्रमवारी नाही, तर आपल्या बदलत्या जीवनशैली, कुटुंबरचना आणि प्राधान्यक्रमांचे प्रतिबिंब आहे.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे 55 वर्षांवरील भारतीयांचा ‘माइंड हेल्थ कोशंट’ (एमएचक्यू) 96 या सन्मानजनक पातळीवर असताना युवकांचा गुणांक अवघ्या 33 वर घसरला आहे. तंत्रज्ञान, संधी आणि संसाधनांनी समृद्ध असलेली पिढी मानसिकदृष्ट्या अधिक असुरक्षित असणे हे आधुनिक विकास मॉडेलवरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. ‘डिजिटल नेटिव’ म्हटले जाते, तीच पिढी डिजिटल जगाच्या दुष्परिणामांनी सर्वाधिक प्रभावित होताना दिसते. स्मार्टफोन आणि ‘सोशल मीडिया’ने संवादाची व्याख्याच बदलून टाकली आहे. बालपणाचा मोठा काळ स्क्रीनसमोर घालवल्याने प्रत्यक्ष सामाजिक कौशल्यांचा विकास होत नाही. आभासी जगात ‘लाईक’ आणि ‘फॉलोअर्स’ची संख्या आत्मसन्मानाचे मोजमाप ठरू लागली आहे. परिणामी, भावनिक संतुलन आणि आत्मनियंत्रणाची क्षमता कमकुवत होत चालली आहे. अहवालात कौटुंबिक जिव्हाळा कमी होत असल्याबद्दलही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 55 वर्षांवरील 78 टक्के लोक स्वतःला कुटुंबाच्या जवळचे समजतात, तर युवकांमध्ये हा आकडा केवळ 64 टक्क्यांवर आहे. भारतीय समाजाची ओळख असलेली संयुक्त कुटुंबपद्धती आणि सामुदायिक बांधिलकी हळूहळू लुप्त होताना दिसत आहे. वाढते एकल कुटुंब, पालकांची व्यस्त दिनचर्या आणि संवादाचा अभाव यामुळे युवक अंतर्मुख आणि एकाकी होत आहेत. संकटाच्या वेळी कुटुंबाकडून मिळणारा भावनिक आधारही आता कमी होत आहे. यासोबतच बदलत्या आहारपद्धतींचाही मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
‘अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड’ आणि ‘जंक फूड’चे नियमित सेवन मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि भावनिक स्थैर्यावर परिणाम करते. 44 टक्के युवक नियमितपणे ‘जंक फूड’चे सेवन करतात, तेव्हा तो केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही धोक्याचा इशारा असतो. मानसिक आरोग्याचा प्रश्न फक्त नैराश्य किंवा चिंतेपुरता मर्यादित नाही. तो युवकांच्या निर्णयक्षमतेवर, एकाग्रतेवर, स्थिर नाती निर्माण करण्याच्या क्षमतेवर आणि तणावातून सावरण्याच्या ताकदीवर परिणाम करतो. युवकवर्ग मानसिकदृष्ट्या अस्थिर असेल, तर राष्ट्राच्या उत्पादकतेवर, सामाजिक सलोख्यावर आणि दीर्घकालीन विकासावर त्याचा परिणाम होणारच. हा अहवाल धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि विशेषतः पालकांसाठी ‘वेक-अप कॉल’ आहे. शिक्षणव्यवस्थेत मानसिक आरोग्याला अनिवार्य घटक म्हणून स्थान देणे ही काळाची गरज आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समुपदेशन व्यवस्था बळकट करणे, स्क्रीन-टाइम नियंत्रणासाठी ठोस राष्ट्रीय धोरण आखणे आणि कुटुंबांमध्ये मुक्त संवादाची संस्कृती पुन्हा रुजवणे अत्यावश्यक झाले आहे. मुलांना केवळ गुणांच्या स्पर्धेत ढकलण्याऐवजी भावनिकदृष्ट्या सक्षम बनवणे गरजेचे आहे. राष्ट्राची ताकद केवळ उंच इमारती, तांत्रिक प्रगती आणि जीडीपीच्या आकड्यांनी मोजली जात नाही. खऱ्या अर्थाने मजबूत राष्ट्र तेच, ज्याची युवा पिढी मानसिकदृष्ट्या संतुलित, आत्मविश्वासपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या जोडलेली आहे. इशारा वेळेत न ओळखल्यास भविष्यात हे संकट अधिक गडद होऊ शकते. विकासाच्या व्याख्येत मानसिक आरोग्य केंद्रस्थानी ठेवण्याची हीच योग्य वेळ आहे. जग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, जागतिकीकरण आणि स्पर्धेच्या नव्या समीकरणांनी मानवी जीवन अधिक वेगवान केले आहे; परंतु या वेगाच्या शर्यतीत प्रौढांच्या तुलनेत युवकांचे मानसिक आरोग्य अधिक वेगाने खालावत असल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे. आहे. हा सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भवितव्याशी निगडित मुद्दा आहे.
