रुग्णवाहिका एकाच जाग्यावर दीड तास बंद , रुग्णाच्या जीविताशी खेळ

पालघर विभागात १०८ रुग्णवाहिन्यांबाबत गंभीर तक्रारी

योगेश चांदेकर

पालघरः राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवांची अवस्था सध्या अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यात सध्या १०८ च्या २९ रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी त्या रुग्णवाहिकांची स्थिती अतीशय दयनीय आहे त्यामुळे अनेक रुग्णवाहिका तांत्रिक बिघाडामुळे मध्येच बंद पडतात. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत डहाणू तालुक्यातील वरोर येथे अशीच एक रुग्णवाहिका क्रमांक MH१४ CL.०६८४ रस्त्यात दीड तास बंद पडली होती; परंतु पर्यायी व्यवस्था वेळेत न केल्याने रुग्णाचे हाल झाले.

राज्यात ग्रामीण तसेच दुर्गम भागात आणि महामार्गावर रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने १०८ सेवा सुरू केली. ग्रामीण व दुर्गम भागामध्ये ही सेवा हीच जीवनरेषा मानली जाते; परंतु गेल्या अनेक वर्षापासून १०८ रुग्णसेवेबाबत अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे या रुग्णवाहिका कुठेही बंद पडतात. काही वाहनांची देखभाल वेळेवर न झाल्याने त्या बंद अवस्थेत आहेत, तर काही वापरण्यास अयोग्य ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत.

जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त आणि ऑक्सिजन का नाही?

पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. राज्य आणि केंद्र सरकार आदिवासी विभागातील रुग्णसेवेसाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करीत असले, तरी प्रत्यक्षात मात्र आदिवासी विभागातील रुग्णसेवेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. गेल्या आठवड्यातच याबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते, तर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत पालघर जिल्ह्यातील रुग्णसेवेचा पंचनामा केला होता. या पार्श्वभूमीवर आज पालघर येथे अनुसया मंगल्या भोईर यांना तातडीने रक्ताची तसेच ऑक्सिजनची गरज होती; परंतु पालघर येथे या सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने या महिलेला डहाणू येथे पाठवण्यात आले. जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त आणि ऑक्सिजन का उपलब्ध होऊ शकला नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, जिल्ह्याच्या ठिकाणाहून तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयाला रेफर करण्याचा अजब प्रकार पालघरमध्ये झाला.

रुग्णवाहिकेसोबत डॉक्टरही नाही

रक्त आणि ऑक्सिजन पालघरला उपलब्ध न झाल्याने १०८ रुग्णसेवेच्या रुग्णवाहिकेतून या वयोवृद्ध महिलेला डहाणूला पाठवण्यात आले; परंतु पालघरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच ही रुग्णवाहिका बंद पडली. ती सुरू करण्याचा प्रयत्न करूनही त्यात अपयश आले. पर्यायी रुग्णवाहिकेची मागणी करूनही ती दीड तासापर्यंत उपलब्ध होऊ शकली नव्हती. रक्त आणि ऑक्सिजनची तातडीची गरज असतानाही या महिलेला उपचारासाठी तसेच थांबून राहावे लागले. विशेष म्हणजे तातडीच्या आणि गुंतागुंतीच्या वेळी अशा रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर देणे आवश्यक असतानाही या रुग्ण महिलेसोबत डॉक्टर दिलेला नव्हता. त्यामुळे पालघरचा आरोग्य विभाग किती निष्क्रिय आहे आणि किती बेपर्वाईने काम करतो हे यातून दिसून आले.

आरोग्य विभागाकडून हेळसांड

रुग्णवाहिका चालकाने पर्यायी रुग्णसेवेसाठी प्रयत्न केला; परंतु त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पालघर जिल्ह्यातील आरोग्यव्यस्थेची स्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय आदीमध्ये डॉक्टरांची कमतरता असते. वेळेवर ‘ऑन कॉल’ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे एका गर्भवती महिलेला उपचारासाठी कसे दोन-तीन तास फिरावे लागले आणि शेवटी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला, हे गेल्याच महिन्यात उघडकीस आले होते. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल आरोग्य उपसंचालकाकडे पाठवला असला, तरी अद्याप त्यावर कार्यवाही झाली नसताना आता पुन्हा रुग्णसेवेच्या हेळसांडीचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुले, महिला, वयोवृद्धांना फटका

आदिवासी, दुर्गम भागामध्ये रुग्णसेवा तातडीने पोहोचणे आवश्यक आहे; परंतु अशाच भागामध्ये रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याने गंभीर रुग्णांना जीव गमावा लागण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. विशेषतः गर्भवती महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसला आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी त्यावर अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. आरोग्य विभागाने तातडीने रुग्णवाहिकाची दुरुस्ती, आरोग्य विभागात पुरेसे मनुष्यबळ आणि आरोग्य केंद्राची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. आ. वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या पालघर जिल्ह्यातील  डहाणू व अन्य ठिकाणच्या आरोग्य संदर्भातील तक्रारीची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गांभीर्याने दखल घेतली असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात मात्र अजून आरोग्य विभाग पुरेसा हललेला दिसत नाही, हे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

१०८ रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे महिलेला एक ते दीड तास उपचारा अभावी ताटकळत रहावे लागले ही बाब गंभीर आहे याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. रुग्णवाहिकेमधील महिलेवर योग्य उपचार करावे याबाबत डहाणू उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना सूचना केल्या आहेत.

१०८ रुग्णवाहिकेच्या दयनीय अवस्थेबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत वरीष्ठ कार्यालयाला अनेकदा अहवालही पाठवले आहेत

डॉ.रामदास मराड, जिल्हाशल्य चिकित्सक पालघर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *