निमित्त जागतिक होमिओपॅथी दिनाचे…
१० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. १० एप्रिल १७५५ रोजी जन्माला आलेल्या डॉ. सॅम्युअल हॅनिमन या शास्त्रज्ञाने या आगळ्यावेगळ्या उपचार पद्धतीचा शोध लावला. त्यामुळे हा दिवस होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो.
आज जगात विविध उपचार पद्धती कार्यरत आहेत. त्यात सर्वसामान्यांना चालणारी ऍलोपॅथी, त्याचबरोबर भारतीय शास्त्रानुसार प्राचीन काळापासून चालत असलेले आयुर्वेद शास्त्र आणि होमिओपॅथी या प्रमुख उपचार पद्धती मानल्या जातात.
होमिओपॅथी या उपचार पद्धती बद्दल बरेच गैरसमज आहेत. त्यातील अनेक गैरसमज पसरवले देखील गेलेले आहेत. तसेच गैरसमज आयुर्वेदशास्त्राबाबत देखील पसरवले गेले आहेत. त्याला जबाबदार ऍलोपॅथी उपचार पद्धतीचे पुरस्कर्ते असल्याचेच बोलले जाते. कारण ऍलोपॅथी ही उपचार पद्धती आज जगमान्य पद्धती म्हणून ओळखली जाते. या ऍलोपॅथीला लागणारी औषधे उपकरणे याचे उत्पादन करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या जगभर सक्रिय आहेत. त्यामुळे आपले हितसंबंध दुखावले जाऊ नयेत यासाठी देखील या कंपन्यांकडून असा अपप्रचार केला जात असतो.
होमिओपॅथीबद्दल जे अनेक गैरसमज आहेत त्यातला एक प्रमुख गैरसमज म्हणजे हे साबुदाण्याच्या गोळ्यांचे शास्त्र आहे. साबुदाण्यापेक्षाही बारीक आकाराच्या या पाच-सात गोळ्या तुमचा आजार काय बरा करणार आहेत असे होमिओपॅथीचे विरोधक वारंवार सांगत असतात. त्यामुळे सर्वसामान्य माणूस होमिओपॅथी पासून थोडा दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र अनेकदा या साबुदाण्याच्या आकाराच्या पाच-सात गोळ्याच खूप काही करून जातात हे अनुभव घेतल्यावर लक्षात येते.
ऍलोपॅथीच्या उपचार पद्धतीत वेगवेगळ्या रोगांसाठी वेगवेगळी औषधे दिली जातात. साधारणपणे वयापर्यंत माणसाला वेगवेगळ्या व्याधी त्रास देत असतात. मग अशावेळी प्रत्येक व्याधीसाठी वेगवेगळी औषधे आणि वेगवेगळे उपचार असे करून अनेक रुग्ण मग दिवसभर फक्त गोळ्याच खातात, आणि सायरप पितात. बाकी इतर अन्नधान्य अभावानेच त्यांच्या पोटात जात असते. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त व्याधींसाठी एकच औषध देऊन त्या सर्व व्याधी आटोक्यात कशा आणता येतील हा प्रयत्न केला जात असतो, आणि अनेकदा तो यशस्वी झाल्याचेही दिसून येते. त्यामुळेच ज्यावेळी आपण एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टर कडे औषधोपचारासाठी जातो त्यावेळी तो तुमची संपूर्ण माहिती घेत असतो. मग त्यात तुमच्या आजच्या सवयी काय आहेत? जुन्या सवयी काय होत्या? जुने काही आजार झाले होते का?त्यावर काय उपाय केले गेले? अशी सर्व माहिती घेऊन मग त्यावर अभ्यास करून तो होमिओपॅथ तुम्हाला एकच औषध देतो, आणि त्याने तो तुमचे बरेचसे आजार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतो.
एक गोष्ट मान्य करायला हवी की ऍलोपॅथीने जसा झटपट फायदा होतो तसा होमिओपॅथीने झटपट फायदा होत नाही. तिथे तुम्हाला काही वेळा दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात. मात्र ऍलोपॅथीने झटपट झालेला फायदा हा क्षणिक असतो. त्या औषधाचा असर उतरला की त्रास पुन्हा सुरू होतो. होमिओपॅथी मध्ये तसे होत नाही. तिथे औषध जास्त वेळ घ्यावे लागते. मात्र जो काही फायदा होतो तो दीर्घकालीन असतो. असे असले तरी सामान्य माणूस फक्त झटपट फायदा बघतो आणि आपले नुकसान करून घेतो.
ऍलोपॅथीच्या औषधाने बरेचदा साईड इफेक्ट्स सुद्धा बरेच होतात. होमिओपॅथीने असे साईड इफेक्ट्स होत नाहीत असेही अनेक प्रकरणांमध्ये आढळून आले आहे. खूप वर्षांपूर्वी मी एक दम्याचा रुग्ण बघितला होता. त्या रुग्णाला दम्याचा इतका जोरदार अटॅक आला होता की त्यांच्या ऍलोपॅथीच्या डॉक्टरने हात टेकले आणि रुग्णाला सरळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा असा सल्ला दिला. मात्र एका होमिओपॅथने काही तात्पुरती औषधे प्रायोगिक स्तरावर दिली आणि त्या रुग्णाला आराम पडू लागला. मग त्याच होमिओपॅथीचे औषध घेऊन तो रुग्ण नंतर जवळजवळ ३८ वर्ष जगलेला मी बघितला आहे.
होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीची ही किमया नाकारता येणार नाही. साधारणपणे ऍलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये आजार थोडा जरी आटोक्याबाहेर जातो आहे असे दिसले की डॉक्टर लगेच पेशंटला हॉस्पिटलाइज करायला सांगतात. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दुनिया भराच्या तपासण्या मग ऑपरेशन असे सर्व प्रकार सुरू होतात. आणि पेशंटला बऱ्यापैकी आर्थिक भुर्दंड बसलेला असतो. होमिओपॅथी मध्ये ते होत नाही. ऍलोपॅथीच्या तुलनेत होमिओपॅथीची औषधे खूप स्वस्त आहेत. ती औषधे तुम्ही जर दीर्घकाळ घेत राहिलात, तर तुम्हाला अनेक त्रासापासून मुक्ती मिळू शकते.
जो प्रकार होमिओपॅथी बाबत आहे तोच प्रकार आयुर्वेदाबाबतही आहे. आयुर्वेदामध्ये देखील साईड इफेक्ट्स कमी असतात. तिथे औषधे होमिओपॅथीसारखी स्वस्त नसतात, मात्र त्याचा परिणाम देखील दीर्घकालीन असतो, आणि साईड इफेक्ट्स देखील नसतात. अनेक दुर्धर आजारांमध्ये ऍलोपॅथीने हात टेकल्यावर आयुर्वेदाने त्या रुग्णांना बरे केलेले दिसून आले आहे.
असे असले तरी होमिओपॅथी आणि आयुर्वेद या दोन्ही शास्त्रांमध्ये काही मर्यादा येतात. ऍलोपॅथी मध्ये तपासण्या करण्यासाठी पॅथॉलॉजी ही सोय आहे. तसेच एक्स-रे सोनोग्राफी अशी आधुनिक तंत्र देखील उपलब्ध आहेत. ही तंत्रे आयुर्वेद शास्त्रात किंवा होमिओपॅथी मध्ये सुरुवातीला नव्हती. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टर्स किंवा आयुर्वेदिक वैद्यांना निदान करताना मर्यादा येत होत्या.
मात्र आता आयुर्वेद आणि होमिओपॅथी मधील अनेक डॉक्टर्स या आधुनिक निधान पद्धतीचा आधार घेऊन औषधोपचार करीत आहेत. त्याचा फायदा देखील होताना दिसतो आहे. निदान जास्त अचूक होते आणि रुग्णांना लवकरात लवकर फायदा देखील मिळतो असे दिसून आले आहे.
असे असले तरी ही तीनही शास्त्रे एकमेकांशी वैर असल्यासारखीच वागतात. विशेषतः ऍलोपॅथीचे डॉक्टर्स होमिओपॅथी आणि आयुर्वेदाला कायम विरोध करतानाच दिसून येतात. रुग्णाला शेवटी आराम पडणे महत्त्वाचे असते. पण ऍलोपॅथीचे डॉक्टर्स ते मानायला तयार नसतात. त्यामुळे अनेकदा अनेक समस्या निर्माण होतात.
मागे सुमारे २५ वर्षांपूर्वी भारतातील ज्येष्ठ हृदयरोगतज्ञ डॉक्टर नीतू मांडके यांनी भारतात या सर्वच उपचार पद्धतींचा एकत्रित अभ्यासक्रम तयार केला जावा आणि वैद्यकशास्त्राकडे वळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या सर्व उपचार पद्धतींचे ज्ञान पहिले दिले जावे. मगच त्याला ज्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करायचे असेल त्या क्षेत्रात करण्याची मुभा दिली जावी. सूचना खरोखरी चांगली होती. मात्र शासकीय यंत्रणेवरील बहुराष्ट्रीय औषध निर्मिती कंपन्यांच्या प्रभावामुळे असा निर्णय आजवर घेतला गेलेला नाही. नाही म्हणायला आता देशात नरेंद्र मोदी सरकारने या सर्व उपचार पद्धतींचा एकत्रित अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालय गठीत केले आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून या सर्व पॅथींना एकत्र आणून संशोधन देखील केले जात आहे. तसे झाले तर त्याचा निश्चितच फायदा होईल. आज एका काळात भारतीय आयुर्वेद शास्त्र हे जगात श्रेष्ठ मानले जात होते. त्यावर जर संशोधन झाले आणि त्यात या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला तर भारतीय शास्त्राला जागतिक मान्यता मिळेल. या तीनही उपचार पद्धती एकत्रित करून जर एक रुग्णोपयोगी अशी उपचार पद्धती तयार केली गेली तर ती फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक वरदानच ठरेल यात शंका नाही.
मात्र परदेशातील औषध निर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतातील त्यांचे समर्थक हे होऊ देणार नाहीत. कारण त्यांचे हितसंबंध तिथे गुंतलेले आहेत. इथे वेळ आहे ती सामान्यांनी जागे होण्याची. आता जनसामान्यांनीच जागे व्हायला हवे. आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा आपल्याला हक्क आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी आपण संघर्ष करायलाच हवा, इतकेच जागतिक होमिओपॅथी दिनाच्या निमित्ताने आपल्याला सहज सुचले म्हणून सुचवावेसे वाटते.
सहज सुचलं म्हणून
अविनाश पाठक
